मुक्तपीठ टीम
काँग्रेस नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्षाचे नेते बिथरले आहेत. भाजपाच्या नेत्यांचे संतुलन बिघडले असून त्याच निराश मानसिकतेतून पदयात्रेवर टीका केली जात आहे परंतु भाजपाच्या या टीकेचा पदयात्रेवर तसूभरही परिणाम होणार नसून ही पदयात्रा जनतेच्या अभूतपूर्व प्रतिसादासह काश्मीरपर्यंत मार्गक्रमण करत राहील, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त टिळक भवन येथे आदरांजलीचा कार्यक्रम झाला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपाच्या अहंकारी सत्तेला देशातील जनता कंटाळली आहे. हुकूमशाही कारभार व अहंकार यामुळे जनतेमध्ये भाजपाविषयी मोठा संताप आहे. भारत जोडो पदयात्रेवर पहिल्या दिवसापासूनच भाजपाचे नेते टीका करण्याचा प्रयत्न करत आहेत पण ही टीका त्यांच्यावर उलटत आहे. पदयात्रेतील लोकांचा सहभाग व प्रतिसाद प्रचंड आहे. लोकशाही, संविधान अबाधित ठेवणे व भारताची एकात्मता व विविधता कायम राखण्यासाठी निघालेल्या या पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही या पदयात्रेची दखल घ्यावी लागली म्हणूनच ते दिल्लीच्या मशिदीत जाऊन इमाम यांची भेट घेऊन आले. भाजपातील काही दुय्यम दर्जाचे पदाधिकारी भारत जोडो यात्रेवर अनावश्यक टीका करत आहेत त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, अशा टीकेमुळे भाजपाच्या नेत्यांचेच हसे होत आहे.
देशाची अर्थव्यवस्था रसातळाली गेली आहे, रुपयाची घसरण थांबत नाही, भाजपा सरकार महागाईवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, बेरोजगारीची समस्या प्रचंड आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. या मुद्द्यांवर सत्ताधारी भाजपाकडे बोलण्यासारखे काहीच नाही, जनतेला तोंड दाखवायलाही त्यांना जागा नाही म्हणूनच ते पदयात्रेवर टीका करून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. कोण, कोणता मेळावा घेतो, किती खर्च करतो, हे काँग्रेससाठी महत्वाचे नाही. भाजपा जर महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्नांवर मेळावा घेणार असेल तर त्यांच्या मेळाव्याला आम्ही लोक पाठवू, असा टोलाही पटोले यांनी भाजपाला लगावला.
काँग्रेसचे ‘जय बळीराजा’ व ‘रामराम’..
गांधी जयंतीच्या निमित्ताने आजपासून राज्यात ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणावे असा शासन आदेश काढला आहे, त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, वंदे मातरमला आमचा विरोध नाही पण आपला देश कृषीप्रधान आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. या अन्नादात्याबदद्ल कृतज्ञता व्यक्त करावी याच भावनेने ‘जय बळीराजा’ व ‘रामराम’ म्हणावे अशी आमची भूमिका आहे.
टिळक भवन येथे महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली पाहण्यात आली, यावेळी भजन गायनही झाले. या कार्यक्रमावेळी प्रदेश उपाध्यक्ष चारुलता टोकस, माजी आमदार हुस्नबानो खलिफे, किसान काँग्रेसचे शाम पांडे, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम, सुभाष कानडे, राजन भोसले, राजेश शर्मा, प्रमोद मोरे, देवानंद पवार, गजानन देसाई, जोजो थॅामस, संतोष केणे आदी उपस्थित होते.