मुक्तपीठ टीम
पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजपाने आघाडी सरकार त्यातही शिवसेनेला आक्रमक पावित्र्याने जेरीस आणण्यास सुरुवात केली आहे. तसे करताना भाजपाने या लढ्याची जबाबदारी दिलेल्या चित्रा वाघांपासून सर्वच भाजपा नेते वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संवेदनशीलतेचा उल्लेख करत अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या जनमानसातील प्रतिमेलाच धक्का देण्याचा प्रयत्न करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
काहीही करून एका तरी मंत्र्याला घरी पाठवायचे, या रणनीतीनुसार भाजपा आक्रमक झाली असली तरी त्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची स्वच्छ, संवेदनशील प्रतिमेला धक्का देणे हाच खरा अजेंडा असल्याचे मानले जाते. विधिमंडळ अधिवेशनात आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपाने पूर्ण तयारी केली आहे. त्यातही आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पूजा चव्हाण प्रकरणावरूनच सरकारला जास्तीत जास्त घेरण्याची तयारी करण्यात आली आहे.
फडणवीसांकडून ठाकरेंना राजधर्माची आठवण?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूजा चव्हाण प्रकरणी आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महिलांवरील अत्याचार वाढत असताना आरोपींवर नाही तर आंदोलन करणाऱ्या महिलांवरच कारवाईचा त्यांनी निषेध केला. तसेच महिला अत्याचाराचे विषय राजकारणापलीकडे असले पाहिजेत, असं सांगताना त्यांनी सरकार हे नेहमी पालकत्वाच्या भूमिकेत असलं पाहिजे असं सांगत अप्रत्यक्षरीत्या त्यांचे जुने मित्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजधर्मचीच आठवण करून दिली असल्याचे मानले जाते.
खुर्चीसमोर आयाबहिणींची अब्रू काहीच नाही का? – चित्रा वाघ
भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ आज अधिकच आक्रमक झाल्या. पण त्यांच्या आक्रमकतेतही एक सूत्र दिसते आहे.
त्यांची ठळक विधानं पुढील प्रमाणे:
“मुख्यमंत्री महोदय, आम्ही विरोधात असलो तरी तुमच्याबद्दल आदर आहे. या सर्वांमध्ये तुम्ही वेगळे आहात. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते फक्त शिवसेना पक्षप्रमुख असते तर संजय राठोडला फाडून खाल्ले असते. आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे. तुम्ही या मंत्र्याला हाकलून द्या. खुर्ची इतकी वाईट आहे का? खुर्चीसमोर आयाबहिणींच्या अब्रूची किंमत नाही का?”
उद्धव ठाकरे सत्यवादी, पण तसे दिसत नाही! – चंद्रकांत पाटील
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर सरकारलाच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही थेट आव्हान दिले आहे. “सोमवारपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. सोमवारच्या आत जर राज्य सरकारने संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, त्यांची चौकशी सुरू करावी आणि मुख्यमंत्र्यांनी यावर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवेदन करावे, नाहीतर आम्ही या मुद्द्यावर तोंड न उघडणाऱ्या राज्य सरकारला अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही, सभागृह चालू देणार नाही”, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी “मुख्यमंत्री सत्यवादी असून कुणावरही अन्याय होऊ देणार नाही” असे म्हटले होते. त्यांना प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “उद्धव ठाकरे हे सत्यवादी आहेत हे मान्य आहे. प्रबोधनकार ठाकरेंचे ते नातू आहेत. पण व्यवहारात तसे दिसत नाही. भूमिका घेताना त्यांना स्वत:च्या खुर्चीची काळजी आहे. त्यामुळे संजय राऊतांना ते सत्यवादी कुठे दिसले, माहीत नाही.”
आमचे मित्र असतानाचे उद्धव ठाकरे बदललेत का? – मुनगंटीवार
भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही पूजा चव्हाण प्रकरणी प्रतिक्रिया देताना आमचे मित्र असताना संवेदनशील असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बदललेलत का? असा सवाल केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘प्रतिमा’ भाजपच्या मार्गात अडथळा!
गेल्या वर्षभरात दोन राष्ट्रीय सर्वेक्षण संस्थांनी केलेल्या पाहणीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे दिसून आले.
आयएएनएस आणि सी व्होटर्सने देशभरात एक सर्वेक्षण केलं. यामध्ये राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर बहुतांशी मतदारांनी शिक्कामोर्तब केलं. ६६.२० टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांना पसंती दर्शवली.
या सर्वेक्षणानुसार लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे यांना ७६.५२ टक्के मते मिळाली होती.
जूनमधील या सर्वेक्षणानंतर इंडिया टुडेने केलेल्या सर्वेक्षणातही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात लोकप्रिय असल्याचे उघड झाले.
त्यामुळे स्वाभाविकच भाजपाला महाराष्ट्रात परत येण्याचं स्वप्न साकारण्यासाठी आघाडी सरकारचे सर्वात मोठे बलस्थान असणारी उद्धव ठाकरे यांची स्वच्छ, राजकारणविरहित प्रतिमेला धक्का देणे आवश्यक वाटले, असे मानले जाते. त्या दृष्टीनेच भाजपाचे नेते राठोड यांच्या निमित्ताने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य करत असावेत, ते एका रणनीतीतूनच!