मुक्तपीठ टीम
मुंबईतील टिळक नगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे सोमवारी रात्री मुस्लिम समाजातील एका व्यक्तीने आपल्या हिंदू पत्नीची भर रस्त्यात गळा चिरून हत्या केली. बुरखा घालण्यास आणि मुस्लिम रितीरिवाज पाळत नसल्याने तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. इक्बाल मोहम्मद शेख असे आरोपीचे नाव आहे. तीन वर्षांपूर्वी पीडित रुपाली चंदनशिव आणि आरोपी इक्बाल यांनी प्रेमविवाह केला होता. या दाम्पत्याला दोन वर्षांचा मुलगा आहे.
रितीरिवाज पाळत नसल्याने भांडणं!!
- मृत महिलेच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे टिळक नगर पोलिसांनी घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
- रुपालीच्या कुटुंबीयांनी पोलिस तक्रारीत म्हटले आहे की, इक्बाल आणि त्याच्या कुटुंबीयांनी लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच तिच्यावर मुस्लिम रितीरिवाज पाळण्यासाठी आणि बुरखा घालण्यासाठी दबाव आणला.
- मात्र, रुपालीला हे मान्य नव्हते.
- यावरून दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचे आणि रुपालीही गेल्या काही महिन्यांपासून वेगळी राहत होती.
- टिळक नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास राठोड यांनी सांगितले, “इक्बाल मोहम्मद शेख याने २६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नीचा गळा चिरून आणि चाकून तिच्या सपासप वार करून हत्या केली.
यामुळे केला खून…
- पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “गेल्या काही महिन्यांपासून ते वेगळे राहत होते. मात्र, त्यांच्यात फोनवर बोलणे आणि भांडणे व्हायची.
- सोमवारी दोघे फोनवर बोलत असताना महिलेने आरोपीकडे घटस्फोट मागितला.
- यानंतर आरोपीने आपल्या मुलाचा ताबा मागितला, त्याला महिलेने विरोध केला.
- यावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्यातून हा खून झाला.
घटनास्थळी नेमकं काय घडलं?
- इक्बाल रुपालीला घरी परतण्यासाठी तिला भेटायला गेला होता.
- पण रुपाली घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम होती.
- त्यानंतर रागाच्या भरात आरोपीने पत्नीला जवळच्या रस्त्यावर ओढून नेले आणि तिचा गळा चिरून तिच्यावर चाकूने वार केले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.
- गुन्हा केल्यानंतर इक्बालने घटनास्थळावरून पळ काढला.
- रुपालीचा आरडाओरडा ऐकून स्थानिक लोक तिच्या मदतीला धावले आणि ही बाब पोलिसांना कळवण्यात आली.
- पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
- काही वेळातच पोलिसांनी आरोपीला अटक केली.
- पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.