मुक्तपीठ टीम
राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज असून यासंदर्भात जैवविविधता प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर येथे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जैवविविधतेचे संवर्धन करणे हे अत्यंत आवश्यक असल्याने महाराष्ट्रातील सर्वांसाठी एक प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर येथे सुरु करण्यात येईल. या केंद्रामध्ये वर्षांतील ३६५ दिवस जैवविविधता जपण्यावर प्रशिक्षण देण्यात येईल. राज्य शासनातील विविध विभागात काम करणारे अधिकारी, विद्यार्थी, शेतकरी, कृषी तज्ज्ञ यांच्यासह याविषयावर संशोधन करणाऱ्यांसाठी या केंद्राचा फायदा होईल.
जैवविविधता विषयावर क्यूआर कॉफी टेबल बुक
जैवविविधता म्हणजे नेमके काय, जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता तसेच या क्षेत्रात तज्ज्ञ लोकांनी केलेले काम लोकांसमोर आणण्यासाठी छोटेखानी क्यूआर कॉफी टेबल बुक तयार करण्याचे नियोजन करण्यात यावे. जैवविविधता मंडळाने एक स्वतंत्र ॲप तयार करुन राज्यातील सर्व ग्रामपंचायतीना यामध्ये जोडून घ्यावे. तसेच जिल्हा नियोजन समिती निधीमध्ये जैवविविधतेसाठी काही निधी देता येतो का याची माहिती घ्यावी. राज्य शासनामार्फत विविध विभागांमध्ये पदभरती करण्यात येणार असून वन विभाग आणि जैवविविधता मंडळाकडे आवश्यक पदभरती याबाबत माहिती त्वरित देण्यात यावी, असेही सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
जैवविविधतेवर मराठीत साहित्य उपलब्ध करा
जैवविविधता मंडळामार्फत तयार करण्यात आलेले १ ते ३ खंड त्वरित मराठीत करण्यात यावेत जेणेकरुन ते अनेक विद्यार्थ्यांपर्यंत मातृभाषेत असल्यामुळे पोहोचण्यास मदत होईल. पहिली ते दहावीपर्यंतच्या पाठयपुस्तकात पर्यावरण, जैवविविधता यावर पाठ असेल याची खात्री करुन घेण्यात यावी अशा सूचनाही सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. मानव विकास निर्देशांकामध्ये शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यावर भर देण्यात येतो. गडचिरोली आणि नंदुरबार यासारख्या ठिकाणी रानभाज्या आणि दुर्मिळ प्रजाती मुबलक सापडतात अशा वेळी येथील स्थानिक बाबींना बाजारपेठ कशी मिळेल तसेच मोठमोठ्या बाजारांबरोबर ऑनलाईन करार कसे करता येतील याकडे लक्ष देण्यात यावे. दरवर्षी रानभाज्या महोत्सव आयोजित करुन या रानभाज्यांना चांगली बाजारपेठ मिळण्यासाठी आणि यांची लोकप्रियता वाढविण्यासाठी प्रसिध्द शेफ यांचीही मदत घेण्यात यावी, असेही वनमंत्री यावेळी म्हणाले.
या बैठकीदरम्यान महाराष्ट्र जेन बँक प्रोगॅम फ्रेशवॉटर बायोडायर्व्हसिटी, स्थानिक पिकांमधील विविधता पिक वाणांची सूची, कृषी जैवविविधता संवर्धन व्यवस्थापन आण्णि पुनरुज्जीवन : दृष्टीकोन व मार्गदर्शक तत्वे, बियाणे बँकाची उभारणी आणि व्यवस्थापन, जनुकांचे वारसदार, जनावरांसाठी चाऱ्यांचा प्रश्न कसा सोडवाल, महाराष्ट्र जनुक कोश प्रकल्प या पुस्तकांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. तसेच जैवविविधता मंडळामार्फत जैवविविधता या विषयावर ३७ लघुपट युटयूबवर प्रदर्शित करण्यात आले.
या बैठकीला वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, मत्स्यविकास विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नानोटिया, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) डॉ. वाय. एल. पी. राव, महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. क्षे. ही. पाटील, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, जैवविविधता मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रविण श्रीवास्तव, पद्मश्री राहीबाई पोपेरे, बीएआयएफचे विश्वस्त गिरीश सोहनी, डॉ. राजश्री जोशी, ममता भांगरे, योगेश नवले, यांच्यासह जैवविविधतेवर काम करणारे अभ्यासक उपस्थित होते.