क्रीडा थोडक्यात: १) विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अवघ्या दोन दिवसांत अहमदाबाद कसोटी जिंकून इतिहास घडविला. भारत-इंग्लंड डे नाइट कसोटीत यजमान भारताने १० विकेट्स राखून सहज विजय मिळवला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात २२वेळा दोन दिवसांत निकाल लागले आहेत. अहमदाबाद कसोटीपूर्वी २१ वेळा सामन्याचा निकाल दोन दिवसांत लागला होता, परंतु भारतासाठी १२ तासांत विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. २) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात दुसऱ्याच दिवशी इंग्लंडचा पराभव झाला. पहिल्या डावात इंग्लंडने ११२ तर भारताने १४५ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा डाव ८१ धावांत आटोपला आणि भारताला ४९ धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान सलामीवीर रोहित शर्मा (२५) आणि शुबमन गिल (१५) यांनी सहज पूर्ण केले. या पराभवासोबतच इंग्लंडच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. आतापर्यंत कोणत्याही कसोटी सामन्यात ज्या दिवशी डाव सुरू झाला त्याच दिवशी संघ बाद होणे आणि दोन्ही डावात मिळून २०० धावांचा टप्पाही न ओलांडणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला. ३) पृथ्वी शॉ याने गुरुवारी विजय हजारे करंडक ५० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम नोंदवला. पृथ्वीने १५२ चेंडूंत ३१ चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने उभारलेल्या नाबाद २२७ धावांच्या खेळीमुळे मुंबईने ४ बाद ४५७ धावांचा विक्रमी डोंगर उभारला. त्यामुळे ड-गटात मुंबईने पुदुचेरीवर २३३ धावांनी दिमाखदार विजय नोंदवला. ४) ४०० बळी घेत भारतीय गोलंदाज अश्विन याने विक्रम आपल्या नावे केला आहे. सर्वात जलद ४०० बळी घेणाऱ्यांमध्ये अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. अश्विनने ७७ डावांत ४०० बळींचा टप्पा पार केला आहे. तर श्रीलंकेचा फिरकीपटू मुरलीधरन यानं ७२ डावांत पराक्रम केला आहे. आर. हॅडली आणि डेल स्टेन यांनी ८० कसोटीत ४०० बळींचा टप्पा पार केला आहे. तर रंगना हेरथ याने ८४ व्या कसोटीत हा पराक्रम केला आहे.