सुश्रुषा जाधव / मुक्तपीठ टीम
सर्वजण मोठ्या उत्साहात गणपती उत्सव साजरा करत आहेत पण काहीजण पर्यावरणाची काळजी घेत गणेशोत्सव साजरा करत आहेत. पर्यावरणाचा समतोल राखत गणेशोत्सव साजरा करण्याची मजा वेगळी. सुखहर्ता गणपतीबाप्पा हा विघ्नहर्ताही. मग त्याच्या उत्सवात प्रदूषणाचं विघ्न कसं चालेल? pop किंवा शाडू मातीही नाही तर लाल मातीचा गणपती. विसर्जनाची सोयही समुद्रात नसून घरातल्या घरी. गजानन परशुराम शिंदेंच्या कुटुंबाने पर्यावरणपूरक घरगुती श्री गणेशोत्सव साजरा केला.
मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागात शिंदे कुटुंबीय राहतात. गजानन परशुराम शिंदे मर्चंट नेव्ही सेवेत होते. जगभर सागरी पर्यटन करताना त्यांना पर्यावरणाचं महत्व मनावर ठसलं. त्यांचे चिरंजीवही त्याच क्षेत्रात करिअर करताना त्याच मताचे. त्यांच्यामुळे पर्यावरणविषयक सजगता संपूर्ण कुटुंबाच्याच स्वभावाचाच भाग झालेली. त्यातूनच मग घरगुती गणेशोत्सवात आधी शाडूची मूर्ती आणि मग गेली काही वर्षे फक्त लाल मातीची मूर्ती अवतरली.
गजानन शिंदे यांनी मुक्तपीठशी बोलताना आपल्या कुटुंबाची गणेशोत्सवाची परंपरा मांडली. ते म्हणाले, “आमच्या घरात गेल्या अनेक पिढ्यांपासून गणेशोत्सव साजरा केला जातोय. पणजोबा ते आजोबा, आजोबा ते वडिल आणि आता माझ्यापर्यंत ही परंपरा आली. यापुढे माझी मुलं बाप्पाचा उत्सव साजरा करतील. सुरवातीला फक्त POPची मूर्ती असे. पण पुढे मूर्ती शाडू मातीची आणू लागलो. पण त्यातही त्या मातीचा जलस्त्रोतांना त्रास होतो. त्यामुळे मग आम्ही विचार केला, पर्यावरणाला हानी न करता गणेशोत्सव साजरा करण्याचा. म्हणून आम्ही लाल मातीच्या श्रीमूर्तीचा निर्णय घेतला. आमच्या घरी ५ दिवस गणपती बसवतो. त्याची पुजा अर्चा करतो आणि पाचव्या दिवशी घरातल्या घरी काही कार्यक्रम करून नातेवाईक मिळून घरातच गणपती विसर्जन करतो. विसर्जनाचे ते मूर्ती विरघळलेलं पाणी झाडांना वाहतो.”
विसर्जनाआधी आरती करून घरातले आणि नातेवाईकच नाही तर शेजारी-पाजारीही गणपतीला थाटात निरोप देतात. महिला गरबा खेळतात. तो जल्लोष अनुभवण्यासारखा असतो. त्यानिमित्त सारे एकत्र येतात. सर्व काही विसरत नाचत आंनद व्यक्त करतात. शिंदेंच्या घरातील हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव बुद्धीदात्याच्या उत्सवाची खरी परंपरा पाळणारा म्हणावा लागेल!