मुक्तपीठ टीम
मुलगी झाली, खुशी आली…पहिली बेटी, धनाची पेटी…लेकीच्या आगमनाचं कौतुक वेगळंच. पण त्याचवेळी एक मोठा वर्ग असाही की ज्यांना याच चिमुकल्या, गोजिऱ्या लेकी नकुशा वाटतात. मग कधी स्त्री भ्रूणहत्या तर कधी अजाणत्या वयातच नकुशी नामकऱण आणि जगणं. यामुळेच औरंगाबादच्या सोयगावमधील जिल्हा परिषद शिक्षकांनी स्त्री जन्माचं स्वागत करण्याचा उपक्रम सुरु केला.
दत्तपाडी केंद्रातील जिल्हा परिषद शाळेनं आयोजित या उपक्रमात नुकत्याच जन्मलेल्या नवजात बालिकेचा जन्म सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी जन्मलेल्या नवजात बालिकेचे स्वागत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान लांडगे, शाळेतील बापु बाविस्कर व गणेश बाविस्कर यांनी केले. या मान्यवरांनी नवजात बालिकेचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर आईचा साडीचोळी देऊन सत्कार कऱण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक बापु बाविस्कर यांनी मुलापेक्षा मुलगी का चांगली हे स्री जन्माच्या महत्त्वाविषयी विविध उदाहरणे देत मांडले. या कार्यक्रमाच्या वेळी गावातील महिला व शाळेतील विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून स्री जन्माचे महत्त्व समाजाला समजण्यासाठी सदर उपक्रम नक्कीच समाजासाठी व स्त्री जन्माचा दर वाढवण्यासाठी फायदेशीर ठरेल असे मत महिलांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित सर्वांना शाळेकडून साखर वाटून आनंद साजरा करण्यात आला.
पाहा व्हिडीओ: