मुक्तपीठ टीम
दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्याची वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची परंपरा आहे. याही वर्षी मंडळाने काठमांडू येथील प्रसिध्द पशुपतिनाथ मंदिराची ५२ फुट उंच हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे.
भगवान पशुपतिनाथांचं दर्शन घ्यायचं असेल तर आता नेपाळमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. किमान श्रीगणेशोत्सवात तरी मुंबईतील वांद्रे पश्चिम भागातच आता ही सोय उपलब्ध आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार हे प्रमुख सल्लागार असलेल्या मंडळाच्या गणेशोत्सवाला तुम्ही भेट दिली तर तिथं तेच मंदिर साकारलेलं दिसेल.
वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे २७ वे वर्ष आहे. दरवर्षी एक प्रसिध्द मंदिराची आरास या मंडळातर्फे केली जाते. गतवर्षी केदारनाथ मंदिर साकारण्यात आले होते. तर मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या रत्नागिरीतील वाड्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती. त्यापूर्वी शिर्डीचे साई मंदिर, पंढपरपूचे विठ्ठलमंदिर यासह महाराष्ट्र्र, गुजरात, गोव्यातील प्रसिध्द मंदिराची आरास करण्यात आली होती.
विविध जाती धर्मियांची वस्ती असलेल्या रेक्लमेशन येथे हा गणेशोत्सव साजरा होतो. या उत्सवात सर्वधर्मीय सहभागी होतात. मोठया उत्साहात हा उत्सव साजरा करतात, हेही त्याचे वैशिष्ट. तसेच दरवर्षी चित्रपट, क्रिडा, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या बाप्पाच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव मंडळामध्ये हे मंडळ लक्षवेधी ठरले आहे. तसेच कोरोना काळातही उत्सवाची परंपरा खंडित झाली नाही. सातत्याने २७ वर्षे गणपती सोबतच एका प्रसिध्द देवस्थानाचे दर्शन या मंडळातर्फे भाविकांना घडविण्यात येत आहे.
यावर्षी पशुपतिनाथांचे मंदिर साकारण्यात आले आहे. हिमालयाच्या कुशीत नेपाळ येथे असणारे भगवान शिवाचे हे प्राचिन मंदिर आहे. त्या मंदिराची वास्तुरचना पॅगोडा पध्दतीची आहे. हे मंदिर जागतिक वारसा लाभलेल्या वास्तूंपैकी एक आहे. मंदिराची जशीच्या तशी वास्तूरचना तर करण्यात आली आहे. त्याशिवाय मंदिरात असणारे वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग व मंदिराचा गाभाराही हुबेहुब साकारण्यात आला आहे. ही सकंल्पा ज्यांची आहे असे मंडळाचे प्रमुख सल्लागार आमदार ॲड आशिष शेलार यांनी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी गणेशभक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
धार्मिकेतेसोबत अनेक वैद्यकीय व सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमही राबविण्यात येत आहेत. आरोग्याबाबत आवश्यक ते नियम मंडळातर्फे आम्ही पाळणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी दिली आहे.
मग याच वांद्रे पश्चिमेला…भगवान पशुपतिनाथांच्या दर्शनाला!
पाहा: