मुक्तपीठ टीम
कोरोना काळात प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम देण्यात आलं होतं. कोरोनाचे सावट जसजसे कमी झाले तसतसे वर्क फ्रॉम होम बंद करण्यात आले. परंतु, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस आणि यांसारख्या आणखी मोठ्या कंपनीत ही सुविधा अजूनही सुरू आहे. नुकतीच टीसीएसने आपल्या कर्मचार्यांसाठी वर्क फ्रॉम होम सुविधा बंद करण्याची घोषणा केली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून कार्यालयात रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. जवळपास ३ वर्षांनंतर आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरपासून कार्यालयात बोलावले आहे.
टीसीएस यापुढे वर्क फ्रॉम होम सुविधा देणार नाही…
- नोव्हेंबरनंतर टीसीएस वर्क फ्रॉम होम करू देणार नाही, याचा अर्थ प्रत्येक कर्मचाऱ्याला कामासाठी कार्यालयात जावे लागेल अशी अपेक्षा आहे.
- कंपनी आपल्या कर्मचार्यांना कार्यालयात परत बोलावत आहे कारण ९५ टक्क्यांहून अधिक कर्मचार्यांचे लसीकरण झाले आहे आणि ७० टक्क्यांहून अधिक पूर्ण लसीकरण झाले आहे.
- सध्या घसरत चाललेला बाजार पाहता, टीसीएस वर्क फ्रॉम होम पॉलिसी संपवण्याच्या तयारीत आहे.
सध्या २० ते २५ टक्के कर्मचाऱ्यांची कार्यालयात उपस्थिती!
- सध्या कंपनीच्या कार्यालयात २० ते २५ टक्के कर्मचारीच हजर आहेत.
- टीसीएस सीईओ आणि एमडी राजेश गोपीनाथन यांनी अलीकडेच एका निवेदनात सांगितले होते की, कंपनी रिटर्न-टू-ऑफिस मॉडेल सुरू ठेवेल. कारण, योजना अधिक नियंत्रित पद्धतीने कार्यान्वित करणे आवश्यक आहे.
काही दिवसांपासून कंपनीवर पगार कापल्याचा आरोप होत होता. पण, कंपनीने अशा सर्व आरोपांचे खंडन केले आणि सांगितले की, आम्ही कोणत्याही कर्मचार्याचा पगार कापला नाही आणि ६ लाखांहून अधिक कर्मचार्यांचे पूर्ण पगार दिले आहेत. इन्फोसिस आणि विप्रोने ऑपरेटिंग मार्जिनवरील दबावाला दोष देत व्हेरिएबल पगारातील काही टक्के कपात करण्याचे सांगितले आहे.