मुक्तपीठ टीम
विदर्भातील औद्योगिक विकासासाठी शासनाकडून प्रोत्साहन व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य अभिजित वंजारी यांनी विदर्भातील औद्योगिक विकासाविषयीची लक्षवेधी मांडली. यास उत्तर देताना उद्योगमंत्री श्री. सामंत बोलत होते. विदर्भातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नागपूर व अमरावती अशा दोन महसूली विभागाअंतर्गत एकूण ११ जिल्ह्यांमध्ये सुमारे १६६३२.४२ हेक्टर क्षेत्र संपादीत केले आहे. त्यामध्ये प्रादेशिक कार्यालय, नागपूर येथे ५२ औद्योगिक क्षेत्रे विकसित करण्यात आले आहेत. अमरावती येथे ४४ औद्योगिक क्षेत्रे विकसित करण्यात आलेली आहेत. ही दोन्ही प्रादेशिक कार्यालय मिळून आजपर्यंत विविध औद्योगिक क्षेत्रामध्ये भुखंडाचे वाटप करण्यात आले आहे.
विदर्भातील विकसित करण्यात आलेल्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये सर्व सोयीसुविधा पुरवण्यात आलेल्या असून त्यावर सुमारे १३३६ कोटी रु. खर्च करण्यात आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेल्या औद्योगिक क्षेत्राकरीता विदर्भात औद्योगिकरणास उत्तेजन देण्याच्या दृष्टीने उद्योगाकरिता पाणीपुरवठा दर अत्यल्प ठेवण्यात आले आहे. मागील ९ वर्षापासून पाणीपुरवठ्याच्या दरामध्ये दरवाढ करण्यात आलेली नाही. विदर्भ क्षेत्रात सेवाशुल्कामध्ये सुध्दा २००८ पासून कुठलीही दरवाढ लागू करण्यात आलेली नाही. लघु औद्योगिक क्षेत्राकरीता हा दर आणखी सवलतीच्या दरात म्हणजे १.५० प्रती चौ.मी. प्रती वर्ष आकारण्यात येत आहे. लवकरच या भागाचा दौरा करून आढावा घेणार असल्याचेही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य डॉ.परिणय फुके, प्रवीण दटके, एकनाथ खडसे, डॉ.रणजित पाटील यांनी भाग घेतला.