मुक्तपीठ टीम
कोकणाच्या बोकांडी मारली जात असलेली रिफायनरी विकास नाही तर विनाश घडवेल, असा आरोप होत आहे. कोकणी स्त्रीशक्तीही आता संतापाने एकवटतेय. तिचा दणका यावेळी आक्रमक मानले जाणारे भाजपा नेते निलेश नारायण राणे यांना बसला.या प्रकल्पासाठी राजापूर तालुक्यातील बारसू येथे जमिनीचे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. या सर्वेक्षणाच्या पाहणीसाठी भाजपाचे माजी खासदार निलेश राणे आले असता ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन निलेश राणे यांचा ताफा अडवला. महिल आंदोलकांनी पुढाकार घेत ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी निलेश राणे यांच्या कार्यकर्त्याने शिवीगाळ केली. त्यामुळे महिला आक्रमक झाल्या. त्यानंतर निलेश राणे यांनी जाहीरपणे माफी मागितली.
नेमकं काय झालं?
- रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू येथे जमिनीचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. या सर्वेक्षणाचा आढावा घेण्यासाठी निलेश राणें येथे आले होते.
- यावेळी त्यांच्या गाडीचा ताफा ग्रामस्थांनी अडवला.
- महिलांनी रस्त्यातच ठिय्या आंदोलन सुरू केले.
- तसेच नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्या राणेंकडून या रिफायनरीचे समर्थन का? असा प्रश्नही ग्रामस्थांनी विचारला.
- यावेळी तेथे राणे समर्थक पोहोचले आणि त्यांच्याकडून शिवीगाळ केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला.
- त्यानंतर निलेश राणे यांनी हात जोडून ग्रामस्थांची माफी मागितली.
काय म्हणाले निलेश राणे?
- आपण जो विरोध करत आहात यातून लोकशाही मार्गाने मार्ग काढावा लागेल.
- मात्र, तुम्ही जो शिविगाळ केल्याचा आरोप करत आहात, जर कोणी तुम्हाला शिवीगाळ केली असेल, तर मी तुमची हात जोडून माफी मागतो.
- तसेच आमच्या लोकांना समज देतो.
- तुम्ही आमची माणसं आहात.
- तुम्ही आणि आम्ही वेगळे नाहीत.
- मात्र, चर्चेने मार्ग निघू शकतो.
- त्यामुळे कृपा करून हा विषय चिघळू देऊ नका, शांत व्हा.