मुक्तपीठ टीम
मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने गुजरातमध्ये अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी मंगळवारी गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर भागात एका ड्रग्स कारखान्यातून सुमारे ५१३ किलो एमडी ड्रग्स जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्सची किंमत १,०२६ कोटी रुपये आहे. याप्रकरणी मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलने एका महिलेसह ७ आरोपींना अटक केली आहे.
याआधी जून महिन्यात गुजरातच्या सागरी भागात कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जाखो जिल्ह्यात बीएसएफ आणि कच्छ पोलिसांनी एकत्रित कारवाई करत मोठ्या प्रमाणात हेरॉईन जप्त केले. या कारवाईत गुजरात एटीएस आणि भारतीय तटरक्षक दलाने सात पाकिस्तानी नागरिकांना पाकिस्तानी बोटीसह ताब्यात घेतलं होतं.
त्याच वेळी, गेल्या वर्षी, सप्टेंबर २०२१ मध्ये गुजरातमधील मुंद्रा बंदरावर ३ हजार किलो ड्रग्सची खेप पकडली गेली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत २१ हजार कोटी असल्याचे सांगण्यात आले. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अफगाणिस्तानमधून आयात केलेल्या दोन कंटेनरमधून ३ हजार किलो हेरॉईन जप्त केले होते. या प्रकरणी चेन्नई येथून दोघांना अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे मुंद्रा बंदर अदानी पोर्टच्या मालकीचे आहे. अदानी पोर्ट ही गौतम अदानी यांच्या मालकीची कंपनी आहे. विजयवाडा, आंध्र प्रदेश येथे नोंदणीकृत मेसर्स आशी ट्रेडिंग कंपनीने ही खेप आयात केली होती आणि ती टॅल्कम पावडर असल्याची नोंद आहे.
याशिवाय मे २०२२ मध्ये ५६ किलो तर जुलै २०२२ मध्ये ७५ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.