मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचं प्रकरण आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा मांडण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयानं २२ ऑगस्टला पुढील सुनावणी ठरवली असताना, निवडणूक आयोगाने मात्र १९ ऑगस्टला शिवसेनेतील अंतर्गत वादावर सुनावणी ठेवली आहे. शिवसेनेच्या वकिलांनी आज सर्वोच्च न्यायालयाचं लक्ष या घडामोडीकडे वेधले. न्यायालय त्यात लक्ष घालणार आहे.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षातील न्यायालयीन आणि निवडणूक आयोगातील लढाई सध्या सुरु आहे. या न्यायालयीन लढाईची सुरुवात एकनाथ शिंदे गटानं केली. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ बंडखोर शिवसेना आमदारांवर कारवाई सुरु करताच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर शिवसेनेनेही सर्वोच्च न्यायालयात काही याचिका दाखल केल्या. या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी सुरु आहे. त्यातील महत्वाचा मुद्दा पुढे आला तो या प्रकरणाची व्यापकता लक्षात घेत ते घटनापीठाकडे सोपवावे की सध्या सुनावणी करत असलेल्या सरन्यायाधीश रमण्णा यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोरच सुनावणी करायची. त्या मुद्द्यावर २२ ऑगस्टला निर्णय अपेक्षित आहे. गेल्या सुनावणीच्यावेळी शिवसेनेच्या मागणीनुसार सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला घाईत निर्णय न घेण्याचे निर्देश दिले होते. शिवसेनेला योग्य मुदत देण्यासही सांगितले. त्यानुसार निवडणूक आयोगाने आधी ठरलेली सुनावणी पुढे ढकलली. पण नव्यान ठरवलेली तारीख १९ ऑगस्ट ही २२ ऑगस्ट या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या आधीची असल्याने शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यात लक्ष घालण्याचं सांगितलं आहे.
सर्वोच्च न्यायालय : शिवसेना आणि शिंदे गटाच्या ‘या’ याचिकांवर आज सुनावणी…