मुक्तपीठ टीम
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील ७६ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. हिमालय ते कन्याकुमारी, कच्छ ते नागालँड आणि समुद्रातील अंदमान, लक्षद्विपमध्येही उत्साहाला उधाण आलं. सेनादलांचा शिस्तबद्ध उत्साह ते सर्वसामान्यांचा उत्सवी उत्साह…सारंच डोळ्यांचं पारणं फेडणारं. स्वातंत्र्य दिनाच्या अशा चांगल्या वेगळ्या बातम्यांचं हे संकलन…
भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव आसेतूहिमाचल साजरा होतोय. घरोघरी तिरंगा अभियानासाठी ध्वजसंहितेच्या कडक नियमांमध्ये बदल झाल्याने देशभरात तिरंग्याच्या वापराची लाट उसळलेली दिसतेय. गाड्या, मिरवणुका, दुकानं, घरं सगळीकडे वातावरण तिरंगामय झालंय. तिरंगा डौलानं फडकवत ठेवणारे, त्यासाठी प्राण पणाला लावायला लावणारे सेनादलांचे जवान असो की सामान्य माणसं सगळेच उत्साहात आहेत. काश्मिरसारख्या सीमेवरील राज्यातही अभूतपूर्व चित्र पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं दहशतीपासून स्वातंत्र्य मिळाल्याचं तिरंगा अभिमानानं झळकवण्यातून दिसतंय.
काश्मीर खोर्यातील शाळकरी मुलांची अशाच एका फेरीतील गाणी मनाला स्पर्शून जाणारी…तिरंगा मिरवत जातानाच ते गात होते…
मेरा देश, मेरी जान
हर तिरंगा
घर घर तिरंगा
दक्षिण काश्मीरच्या कुलगाममध्ये हर घर तिरंगा मोहीम उत्साहात राबवण्यात आली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा उत्साह तुलाईल खोऱ्यातील मुलांनी एक सणात बदलला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वरात्री एजीपीएस पहलगामच्या विद्यार्थ्यांचा घरोघरी तिरंगा मोहिमेसाठी खास कार्यक्रम सादर केला.
काश्मीरमधील नागरिकांनी घरोघरी तिरंगा मोहिमेत उत्साहान सहभागी होत, देशाच्या भावनांशी एकरुप असल्याचं दाखवून दिलं. एकप्रकारे देशद्रोह्यांना त्यांनी कृतीतून उत्तर दिलं.
देशातील सरकारी विभागही तिरंगा अभियानात सक्रिय राहिले आहेत. तिरुपती स्थानकावर झोकात फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाची एक झलक पाहा.
नॅन्सी सहाय यांनी हजारीबागच्या विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा कार्यक्रमासाठी नेत्रदीपक कार्यक्रमाचं केलेलं चित्रण मांडलंय. घरोघरी तिरंगा मोहिमेत हा वर्गही आघाडीवर आहे.
भारतीय तटरक्षक दलाने घरोघरी तिरंगा मोहिमेसाठी बोट रॅलीचे आयोजन केले होते. समुद्रालाही तिरंगामय करण्यातील कल्पकता कौतुकास्पद अशीच. भारतीय हवाईदलाचा सहभागही आकाशाली तिरंग्याची गवसणी घालणारा ठरला. त्यांचा व्हिडीओ आकाशालाही तिरंगामय केलं गेल्याचं दाखवणारा…तसंच इंडो तिबेट सीमा पोलीस दलातील जवान अर्जून खेरियाल यांनी रचलेलं, संगीतब्दध केलेलं गाणंही तुम्ही नक्की पाहा. मुक्तपीठच्या यूट्युब चॅनलवरील खास व्हिडीओत तुम्ही हे सारं नक्की पाहा.
कर्नाटकातील एका गावातील कुटुंबाचा हा स्वातंत्र्यदिनाचा व्हिडीओ…कार्यक्रम कौटुंबिक…पण भावना मात्र राष्ट्रीय…घरोघरी तिरंगा फडकवण्याची. शिस्तीनं प्रत्येक सदस्य तिरंग्या राष्ट्रध्वजाला देत असलेली सलामी….मनातील देशाविषयीचं प्रेम दाखवणारी!
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या निवासस्थानी मन्नत येथेही तिरंगा फडकला. त्याची पत्नी गौरी खान घरोघरी तिरंगा मोहिमेत सामील झालीच पण तिनं तिरंग्यासह आर्यन-अबरामसोबत पोझही दिली.
सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सारेच घरोघरी तिरंगा मोहिमेत मनापासून सहभागी झाले.