मुक्तपीठ टीम
राज्यात नाविन्यता संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८ जाहीर करण्यांत आले आहे. या धोरण्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ही नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यामध्ये स्टार्ट-अपच्या विकासाकरिता पोषक वातावरण निर्मिती करुन त्यातून यशस्वी उद्योजक घडविण्याकरिता इनम्युबेटर्सची स्थापना व विस्तार, गुणवत्ता परीक्षण व स्टार्टअप्सना बौध्दिक मालमत्ता हक्कासाठी अर्थसहाय्य, ग्रॅड चॅलेंज, स्टार्टअप वीक यांसारख्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याअंतर्गत जिल्ह्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली आहे.
महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेमध्ये महाराष्ट्राच्या तळागाळातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेवून त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, नवसंकल्पनांना तसेच सुरुवातीच्या टप्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरविणे,राज्यातील उद्याजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे असा आहे. या यात्रेचे प्रामुख्याने ३ टप्पे आहेत त्यामध्ये तालुकास्तरीय प्रचार प्रसिध्दी व जनजागृती अभियान, प्रत्येक तालुक्यातील लोक समुह एकत्रित होण्याच्या जागेवर स्टार्टअप यात्रेचा प्रचार व प्रसार करण्यसाठी एक वाहन यात्रेबाबतची संपूर्ण माहिती, नाविन्यपूर्ण संकल्पना व त्याचे इतर पैलू तसेच विभागामार्फत राबवल्या जाणा-या विविध उपक्रमांबद्दल माहिती देईल.
जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्रामध्ये सर्व तालुक्यांत प्रचार प्रसिध्दी झाल्यानंतर, राज्यातील सर्व जिल्हयांत एकदिवशीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्रांचे आयोजन केले जाईल. प्रशिक्षण शिबिरात नाविन्यता तथा उद्योजकतेबाबतचे माहिती सत्र, स्थानिक उद्योजकांची व्याख्याने, तज्ज्ञ मार्गदर्शक व सल्लागारांची सत्रे, तसेच नोंदणी केलेल्या नवउद्योजकांचे संकल्पना सादरीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धाचे आयोजन दिनांक १२ व १३ सप्टेंबर रोजी वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज, सांगली येथे होणार आहे. महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे सांगली जिल्हयामध्ये खालील तालुक्यामध्ये दिलेल्या तारखेस आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक २२ ऑगस्ट २०२२ रोजी खानापूर (विटा) व आटपाडी येथे, दिनांक २४ ऑगस्ट २०२२ रोजी तासगांव व पलूस येथे दिनांक २५ ऑगस्ट २०२२ रोजी मिरज व कवठे महांकाळ, दिनांक २६ ऑगस्ट २०२२ रोजी जत येथे, दिनांक ०२ सप्टेंबर २०२२ रोजी शिराळा व इस्लामपूर – वाळवा, दिनांक ०३ सप्टेंबर २०२२ रोजी कडेगांव येथे होणार आहे.
अधिक माहितीसाठी व आपला सहभाग नोंदविण्यासाठी www.msins.in व www.mahastartupyatra.in या वेबपोर्टलवर संपर्क साधावा. तरी सांगली जिल्हयातील जास्तीत जास्त सर्व नव उद्योजकांनी / आस्थापनानी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी केले आहे.