मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या क्रिकेटच्या देवाची साथ शंभर मुलांना आजाराशी संघर्ष करण्यासाठी मोलाची ठरतेय. सहा राज्यांतील १०० वंचितांच्या उपचारांसाठी सचिन साथ देतोय. मैदानावर शतकं ठोकणाऱ्या या मास्टर ब्लास्टरनं हे एक वेगळं शतकच ठोकलंय. सचिनचं समाजकार्य वेगवेगळ्या संस्थांमार्फत गाजावाजा न करता सुरु असतं. आपल्या संस्थेद्वारे सचिनने महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या सहा राज्यांमधून गरजूंच्या उपचारास सहकार्य केलंय. नोव्हेंबर २०१९ पासून तो हे करत आहे. याआधीही मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये, मध्यप्रदेशासह अन्य काही राज्यांमध्ये सचिनने वंचित समाजघटकांसाठी सहकार्याचा हात पुढे केलाय.
यापूर्वी सचिनने मुंबईतील एसआरसीसी रुग्णालयामार्फत गरजू मुलांसाठी आरोग्य क्षेत्रात चांगले काम केले आहे. सचिनशी संबंधित संस्था सरकारी आणि विश्वस्त रूग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलांना सहकार्य करतात. समाजाच्या तळागाळातील जी मुले, गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत, त्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी सचिन सहकार्य करतो. सचिनच्या संस्थेच्या सहकार्यामुळे पालकांना मुलांवर वैद्यकीय उपचार पूर्ण करण्यास मदत होते.
आसाम, मिझोरम आणि त्रिपुराच्या सीमेवर असलेल्या ईशान्य भारतातील मकुंदा रुग्णालयात मुलांच्या बालरोग उपकरणासाठी सचिन मोलाची साथ देतोय. याआधी मध्यप्रदेशातील ९६० मुलांसाठी त्याने सहकार्य केले होते.