मुक्तपीठ टीम
आपण शाळेत असताना भूगोलात नेहमीच शिकलो आहोत की, पृथ्वी सुर्याभोवती गोल प्रदक्षिणा घालत असते. यावेळी ती स्वत: भोवतीही फिरत असते. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी २४ तास लागतात. मात्र, आता पृथ्वीला आपले दिवस पूर्ण करण्याची घाईच झाली आहे. अलीकडेच पृथ्वीच्या फिरण्याचा वेग वाढल्याचे समोर आले आहे. काही संशोधक याकडे मोठ्या कुतूहलाने पाहत आहेत, तर काही शास्त्रज्ञांनी याबाबत आवश्यक माहितीही प्रसिद्ध केली आहे.
सूर्यमालेत पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि यावेळी ती स्वत: भोवतीही फिरत असते. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी २४ तास लागतात. मात्र, यावर्षी २९ जूनला इतिहासातील सर्वात छोट्या दिवसाची नोंद झाली आहे. या दिवशी पृथ्वीने नेहमीपेक्षा १.५९ मिलिसेकंद कमी वेळेत आपली प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. म्हणजेच सामान्य गतीने फिरणाऱ्या पृथ्वीचा वेग अचानक वाढला आहे.
पृथ्वीचा वेग अचानक वाढल्याने मानवी जीवनात त्याचा परिणाम खूप जास्त आहे. वास्तविक, पृथ्वीचे एक संपूर्ण परिभ्रमण सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या संपूर्ण कालावधीवर परिणाम करते. दीर्घकाळापर्यंत, हे मोठे बदल मानवासह आसपासच्या वातावरणावर परिणाम करू शकतात.
पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीमध्ये यापूर्वी कधी बदल झाला आहे का?
- जेव्हा पृथ्वीच्या फिरण्याचा वेग कमी झाला…
पृथ्वीच्या फिरण्याच्या वेगात झालेली वाढ ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे, कारण पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळात तिच्या फिरण्याचा वेग सातत्याने कमी होत होता. ३.५ अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली तेव्हा एक दिवस सुमारे १२ तासांचा होता. मात्र २.५ अब्ज वर्षांपूर्वी, जेव्हा वनस्पतींमध्ये प्रकाशसंश्लेषण सुरू झाले तेव्हा पृथ्वीच्या फिरण्याचा वेग आणखी कमी झाला आणि एक दिवस सुमारे १८ तासांचा होता. १.७ अब्ज वर्षांपूर्वी युकेरियोटिक पेशींच्या शोधाच्या वेळी, पृथ्वीची परिभ्रमण आणखी कमी झाली आणि एक दिवस २१ तासांचा झाला. गेल्या शतकांमध्ये, पृथ्वीच्या फिरण्याचा वेग इतका कमी झाला आहे की या एक दिवस २४ तासांचा झाला. दरवर्षी पृथ्वीवरील एक दिवस सेकंदाच्या ७४ हजारव्या भागाने वाढतो. यामुळे प्रकाश आणि रात्रीची वेळ सरासरी १२-१२ तासांनी वाढली आहे. त्याचा मानवी जीवनावर तसेच प्राणी, वनस्पती आणि एकूणच निसर्गावर परिणाम झाला आहे.
- गेल्या दशकांमध्ये पृथ्वीच्या फिरण्याचा वेग वाढतोय…
गेल्या काही दशकांमध्ये पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीमध्ये मोठे बदल दिसून आले आहेत आणि ते हळूहळू वेगवान होत आहे. २०२० मध्ये, शास्त्रज्ञांनी गेल्या ५० वर्षांतील २८ सर्वात लहान दिवसांची नोंद केली. सर्वात लहान दिवस १९ जुलै २०२० रोजी नोंदवला गेला. हा दिवस २४ तासांपेक्षा १.४७ मिलीसेकंद कमी म्हणजेच ८६ हजार ४०० सेकंदांचा होता. त्याच वेळी, गेल्या वर्षी २६ जुलै रोजी एक दिवस १.५ मिलीसेकंदने कमी होता.