मुक्तपीठ टीम
केंद्रातील यूपीए सरकारच्या काळात अनेक घोटाळे झाले आहेत, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. २०१४ पूर्वी देशात एक काळ असा होता जेव्हा पंतप्रधानांना पंतप्रधान मानले जात नव्हते आणि प्रत्येक मंत्री स्वतःला पंतप्रधान मानत होता.
अमित शाहा यांनी गुरुवारी ‘संकल्प से सिद्धी’ कार्यक्रमात भाग घेताना सांगितले की, तेव्हा देशात धोरणात्मक लखव्याची परिस्थिती होती. त्यावेळी १२ लाख कोटी रुपयांचे घोटाळे झाले होते. हे घोटाळे रोज वृत्तपत्रात ठळक बातम्यात येत होते. केंद्रीय दक्षता आयोग, सीबीआय आणि सर्वोच्च न्यायालय या अनियमिततेची चौकशी करत होते. तेव्हा भांडवलशाही आणि महागाई शिगेला पोहोचली होती, असा दावाही शाहा यांनी केला. व्यवसाय करणे अत्यंत कठीण होते आणि आर्थिक नुकसानही प्रचंड होते.
शाह म्हणाले की, या घडामोडींमुळे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला बहुमताने जिंकवण्याचा निर्णय देशाने घेतला. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आठ वर्षांत सर्वांगीण आणि सर्वसमावेशक सरकार दिले आहे. असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे सुधारणा झाल्या नाहीत. संपूर्ण समाजाच्या कल्याणाची शपथ घेतली आहे.