मनोज गडनीस
ग्राहकसेवा वगैरे काही म्हटलं जात असलं तरी, बँकिंग व्यवस्थेतील लोक त्यांच्या फायद्याच्याच गोष्टी करतात, याची प्रचिती मला नुकतीच आली. माझे बचत खाते व गृह कर्जाचे खाते असलेल्या एका प्रमुख सरकारी बँकेत नुकताच काही कामासाठी गेलो होतो. एका अधिकाऱ्याने त्याच्या क्युबिकलमध्ये मला बसवले आणि थोडा वेळ थांबा, आलोच असे सांगत तो तिथून निघून गेला. त्याच्या बाजूच्या लाकडी पार्टिशनवर टिपिकल सरकारी बारीक फॉन्टमधे काही पत्रकं लावलेली होती. त्याची वाट पाहात असताना, मी सहजच ती पाहायला लागलो. त्यात वार्षिक सुट्ट्यांचे पत्रक, विविध शाखांच्या व्यवस्थापकांचे नंबर हे दर्शनी भागात होते. त्या खाली, बँकेच्या मुख्यालयाकडून शाखेला आलेल्या सूचनांचे पत्रक, त्या बाजूला मुदतठेवींचे पत्रक असे काहीसे दिसले. मग रिझर्व्ह बँकेकडून बँकेला आलेली काही पत्र/निर्देश/मार्गदर्शक सूचना आदी असल्याचे दिसले. या सर्वांत पलीकडे कोपऱ्यात व्याजदरासंदर्भात एक पत्रक दिसले. माझ्या खुर्चीवरून ते नीट वाचता येत नव्हते. पण तरी काही तरी महत्वाचे असावे असे वाटले.
आपले काम संपवून तो अधिकारी तिथे आला आणि त्याने मला कामाची विचारणा केली. म्हटलं, सांगतो. पण ते पत्रक काय आहे ते पहिले सांगा. तो हसला आणि म्हणाला, पाहिलं वाटत तुम्ही. म्हटलं, नीट दिसलं नाही. काय आहे पण ते ? त्यावर म्हणाला, अहो कर्जावरील व्याजदर कमी करण्यासंदर्भातील रिझर्व्ह बँकेच्या सूचना आणि फॉर्म्युला आहे त्यात !
मी म्हटलं, अरे वा. माझं गृह कर्ज पण तुमच्याच बँकेत आहे. माझं पण कमी अथवा सुधारित दराने होऊ शकते का ? की ही योजना फक्त नव्या ग्राहकांसाठी आहे ? यावर तो अधिकारी म्हणाला, सध्या ज्यांचे कर्ज सुरू आहे, त्यांच्यासाठी पण ही योजना लागू आहे. या योजनेसाठी गृहकर्जाचा दर किती आहे ? असा स्वाभाविक प्रश्न मी विचारला. त्यावर तो अधिकारी म्हणाला की, गृहकर्जाचा दर आता ६.८५ टक्के इतका खाली उतरलेला आहे. जर तुमचा सिबील स्कोअर ७७५ च्या पुढे असेल, तर तुमचे कर्ज ६.८५ टक्के इतके कमी होऊ शकते, अन्यथा तुमच्या सिबील स्कोअरच्या प्रमाणात ते कमी-जास्त असे सुधारित होईल.
मी म्हणालो, तुम्ही माझा सिबिल स्कोअर तपासून घ्या आणि अनुषंगाने मला या योजनेत सहभागी करून घ्या. यावर हो म्हणत, त्याने सर्वप्रथम माझा सध्याचा गृहकर्जाचा व्याजदर तपासला तर तो होता ८.३५ टक्के ! मग त्याने सिबिल स्कोअर आणि प्रोसेसिंग फीसाठी तीन हजार रुपये लागतील, असे सांगत एका फॉर्मवर माझी स्वाक्षरी घेतली आणि दोन दिवसांत कळवतो, असे म्हणाला.
आज सकाळीच त्या बँक अधिकाऱ्याचा फोन आला आणि मला म्हणाला, सर,अभिनंदन. तुमचा सिबिल स्कोअर उत्तम आहे आणि ६.८५ टक्के हा तुमच्या गृहकर्जावरील व्याजाचा नवा दर यापुढे असेल. मी विचारले, मग हप्ता कमी होणार की कालावधी ?, तो म्हणाला तूर्तास दोन्ही नाही. पण तुमच्या गृहकर्जातून आता मुद्दल जास्त वजा होईल आणि व्याज कमी. त्यामुळे कालौघात कर्जाचा कालावधी आपोआपच कमी होईल!
या अधिकाऱ्याचा फोन मी ठेवला आणि सहज विचार करू लागलो की, त्या दिवशी मी बँकेत गेलो नसतो आणि ते पत्रक मला दिसले नसते तर ? एरवी क्रेडिट कार्डापासून विविध (बँकेच्या फायद्याच्या) योजनांच्या प्रसारासाठी पत्र, इ-मेल आणि एसएमएसचा भडीमार करणाऱ्या बँकांना अशा योजनांचा प्रसार ग्राहकांपर्यंत करावासा का वाटत नाही ? त्या अधिकाऱ्याच्या डेस्कवर लावलेले पत्र किमान सहा महिने जुने असावे. सहा महिन्यांपूर्वी जर हे पत्रक आणि त्यातील योजना मला बँकेने त्यांच्या इतर कम्युनिकेशन्सप्रमाणेच कळवली असती तर, सरत्या सहा महिन्यांत जुना ८.३५ टक्के आणि नवा ६.८५ टक्के यातील फरकाने पैसे वाचले असते !!
(ज्येष्ठ पत्रकार मनोज गडनीस हे गेली दोन दशके माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. अर्थकारण, समाजकारण आणि राजकारणाचा चांगला अभ्यास असणाऱ्या मोजक्या मराठी पत्रकारांपैकी ते एक आहेत.)
Useful Information