मुक्तपीठ टीम
सीतेची कथा म्हणजे रामायणाचा शेवटचा भाग. आपण आपल्या काळाच्या बिंदूवर राहून सीतेला आपल्या जगण्याच्या काळाशी जोडून घेऊ शकतो. तो अनुभव सीतेला बघून येतो. सीतेवर ज्याप्रमाणे आरोप करण्यात आले, त्याप्रमाणे आजच्या काळातही स्त्रीवर आरोप होतात. आजही जगभर स्त्रीला आपल्या चारित्र्याची परीक्षा द्यावी लागते. तिच्यावर होणारे आरोप तिला स्वतःला खोडावे लागतात. स्त्रियांबद्दल आजही अत्यंत चुकीच्या कल्पना आहेत. आजही चारित्र्याची परीक्षा स्त्रीला द्यावी लागते. असे मत माजी संमेलनाध्यक्ष प्रख्यात साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. अॅडफिझ’ प्रस्तुत आणि डॉ. माधुरी आणि विनायक गवांदे, महेंद्र पवार, विनोद पवार यांनी ‘सीतेची गोष्ट’ चा हा ३५ वा प्रयोग आयोजित केला होता. या निमित्तानं ‘सीतेची गोष्ट’ या कथेच्या कथेमागची कथा त्या उलगडून सांगत होत्या. यावेळी डॉ. अरुणा ढेरे यांच्या ‘सीतेची गोष्ट’ या दीर्घकथेचे अभिवाचन डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी केले. या विशेष कार्यक्रमाला साहित्य – कला विश्वातील अनेक दिग्दजांनी हजेरी लावली होती.
डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या, ‘की एखादा लेखक परत त्या गोष्टीकडे पाहतो, स्वतः पुनर्रचना करतो. रामायण, महाभारत वाचतो त्या वेळी त्यांचे नव्याने अर्थ प्रतिपादन करतो. काळानुसार कथा जिवंत करण्याचे सामर्थ्य लेखकात असते. सीतेवर सलग कविता लिहिल्या होत्या. त्या अपुऱ्या वाटल्या म्हणून आणखी जे लिहायचं होत ते आणखी म्हणजे सीतेची कथा आहे. सीता ही भूमिकन्या आहे असे मानतात. सीता म्हणजेच नांगराची तास. सीता ही रामाच्या मंदिरात आपल्याला कधी दिसत नाही. ती रानावनात, चुलीवर काम करणारी, दगडात काम करणारी सीता दिसते. त्यामुळे ही कथा जिवंत परंपरेत पकडता आली. स्त्रीला घरातला, बाहेरचा वनवास भोगावा लागतो. यातून सीतेचा वनवास दिसून येतो. साहित्यप्रकाराविषयी बोलताना पुढे त्या म्हणाल्या “अभिजात साहित्य हे लोकपरंपरेपर्यंत पोहचू शकत नाही. कारण त्याची मर्मस्थळे वेगळी आहेत. परंतु तरीही या दोघांनी आपले आयुष्य समृद्ध केले आहे, हे मात्र नक्की”
या कार्यक्रमाला त्याच्या थीमप्रमाणे प्रकाश योजना शीतल तळपदे यांनी केली होती. विनायक गवांदे यांनी लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांचे तर डॉ. माधुरी विनायक गवांदे या कथेचे दिलखुलास अभिवाचन करणाऱ्या डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांचे सोनचाफ्याची परडी देऊन स्वागत केले. आयोजक महेंद्र पवार यांनी लेखिकेचा आणि उपस्थित मान्यवरांचा परिचय तसेच सर्वांचे आभार मानले.