मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर हे शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. आज त्यांनी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी भावूक होत आपली प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे “उद्धव ठाकरेंशी बोलून एकनाथ शिंदेंना पाठिंब्याचा निर्णय घेतला आहे”, असं त्यांनी सांगितले.
काय म्हणाले अर्जुन खोतकर?
- मी जालन्यात माझी भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट करेन, असं सांगितलं होतं.
- त्यानुसार आज मी आपल्याशी बोलत आहे.
- मी १९९० मध्ये शिवसेनेच्यावतीने पहिल्यांदा आमदार झालो आणि आजपर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे, पक्षाची सेवा करत आलो आहे.
- यामध्ये मी एकटाच नाही तर आमचे सर्व सहकारी आणि सगळ्यांनी मिळून जिल्ह्यात शिवसेनचं संघटन वाढवलं आणि ते सामान्य माणासापर्यंत आम्ही ते घेऊन गेलो.
- सामान्य माणसाने देखील तेवढाच विश्वास आमच्यावर टाकला.
- अनेक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत आमच्या पदरात लोकांनी यश टाकलं त्याबद्दल मी जालना जिल्ह्यातील सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो.
- पक्षनेतृत्वाचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो की, त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर टाकली आणि ती जबाबदारी मी समर्थपणे सांभाळू शकलो.
खोतकर परिवाराने कारखान्यात ७ कोटी गुतंवले!!
- मुळात हे प्रकरण सुरू झालं कुठून जालना साखर कारखाना हा तापडियाने विकत घेतला, मीच त्यांना आग्रह केला होता की तुम्ही कारखाना विकत घ्या आणि तेही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी.
- तापडियांनी सुरुवातीला १० टक्के, नंतर १५ टक्के व २५ टक्के रक्कम भरली आणि त्या विहीत मुदतीच्या आतमध्ये त्यांना पैसे भरता येणे शक्य नाही असं त्यांनी मला सांगितलं आणि मग त्या काळात हा कारखाना घेण्यासाठी कोण इच्छुक आहेत, या संदर्भात मी माहिती घेतली.
- त्यामध्ये अजित सीड्सची एक निविदा होती, मी अजित सीड्सशी बोललो, की शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आपल्याला हा कारखाना घ्यावा लागेल.
- तापडियाने २०१२ मध्ये ४२ कोटी रुपयांना घेतला आणि नंतर माझ्या मध्यस्थीने हा कारखाना अजित सीड्सने ४४ कोटी रुपयांना घेतला.
- या कारखान्यात ७५ टक्के रक्कम ही, तातडीने अजित सीड्सने वर्ग केली आणि मग तो कारखाना अजित सीड्सच्या नावावर झाला.
- मी म्हणालो माझ्या भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, मलाही यामध्ये घेतलं पाहिजे, म्हणून मी अजित सीड्सला विनंती केली आणि माझे व परिवाराचे सात कोटी रुपये आम्ही त्या कारखान्यात गुंतवले.
- यामध्ये पाच कोटी मी देवगिरी बँकेकडून कर्ज घेतलं, ते आजही भरलेलं नाही.
- ६० लाख रुपये माझ्या स्वत:च्या नावावर भरलेले आहेत.
- ३५ लाख रुपये माझा भाऊ चक्रधर खोतकर यांच्या नावावर आहेत आणि ५० लाख रुपये माझा लहान भाऊ संजय खोतकरच्या नावावर भरलेले आहेत.
- याशिवाय ९० लाख रुपयांचं पुन्हा एकदा खोतकर बिल्डर्सने कर्ज घेतलं.
- असे मिळून आम्ही सात कोटी रुपये खोतकर परिवाराने या कारखान्यात गुतंवले.
- २०१४ मध्ये हा कारखाना अजित सीड्सने ताब्यात घेतला.
कारखान्यामुळे राजकारणाला वेगळं वळण!!
- आम्ही आयएमएस साठी अर्ज केला, अत्यंत महत्त्वाची ही प्रक्रिया आहे.
- कारखाना सुरू करायचा म्हटलं की आयएमएसचं रजिस्ट्रेशन आपल्याला लागतं, ते मला मिळालं आणि २०१४ मध्ये आमचं नाव त्या ठिकाणी लागलं.
- नंतरच्या कालखंडात ५०० ते ६०० कर्मचारी कोर्टात गेले, त्यांनी दावे दाखल केले.
- नंतर पुढील काळात दुष्काळ पडला तीन वर्ष सातत्याने पाऊस नव्हता, त्यामुळे कारखाना सुरू करण्यासंदर्भात काही हालचाल करता आली नाही.
- २०१९ मध्ये मी वसंतदादा साखर कारखान्याकडून डीपीआर करून घेतला आणि २०२० मध्ये लॉकडाउन लागलं.
- दोन वर्ष लॉकडाउन होतं, मी डीपीआर करून घेतला आणि कारखाना सुरू करण्याच्या संदर्भात घोषणा दिवाळी स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात केली.
- खरं तिथेच या प्रश्नाला वेगळं वळण लागलं.
शेतकऱ्यांच्या कामात मुख्यमंत्री शिंदेंचे मदत करण्याचे आश्वासन…
- मी शेतकऱ्यांसाठी हा कारखाना सुरू करत होतो. नंतरच्या तुम्हाला सर्व हालचाली माहीत आहेत.
- प्रकरण आता न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबत भाष्य करता येणार नाही.
- परंतु, मला सूचक सांगितलं की ती घोषणा करणे, वसंतदादा कारखान्याचा डीपीआर तुम्ही बघा.
- तो कारखाना काही कारवायांमुळे सुरू करू शकलो नाही याचं शल्य माझ्या मनात आहे.
- आज या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे, की कारखाना सुरू केला पाहिजे.
- म्हणून या संदर्भात काही चर्चा मी घडवून आणल्या, राजकारण काय व्हायचं ते होईल.
- त्यामुळे जे काही प्रश्न निर्माण झाले, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.
- मुख्यमंत्र्यांशी बोललो आणि त्यांनी आश्वस्त केलं मला की, या शेतकऱ्यांच्या कामात मी तुम्हाला पूर्णपणे मदत करेन.
- हा प्रश्न माझ्यासाठी आणि इथल्या भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
- याबरोबरच मुख्यमंत्र्यांशी जे बोलणं झालं, माझ्या भागातील हतवण हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या संदर्भात आपण सहकार्य करावं, त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी सहकार्याची भूमिका घेतली.
- शहरात आठ-दहा दिवस पिण्याचं पाणी मिळत नाही, या प्रश्नाकडे देखील मी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं.
- याशिवाय, रस्ता प्रश्न, गौतम बुद्धांच्या पुतळ्याचा प्रश्न, पीआर कार्डचा प्रश्न आदी सर्व प्रश्नांबाबत माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली.
अर्जुन खोतकरांचे एकनाथ शिंदेंना समर्थन!!
- आज सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी माझं या संदर्भात सविस्तर बोलणं झालं.
- मी माझ्यावर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या संदर्भात मी पक्षप्रमुखांच्या कानावर या सर्व गोष्टी टाकल्या.
- संजय राऊत, विनोद घोसाळकर यांच्याशी देखील बोललो आणि जिल्ह्यातील सर्व नेत्यांशी बोललो.
- माझी ही भूमिका आहे, मी सच्चा शिवसैनिक आहे, ४० वर्षांपासूनचा आणि घरी आलं की परिवार दिसतो.
- त्यामुळे काही निर्णय करणं गरजेचं आहे, असं सांगून मी पक्षप्रमुखांकडे परवानगी मागितली आणि ते मला यासंदर्भात जे काही बोलायचं ते बोलले.
- त्यामुळे मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने माझ्या शिवसैनिकांच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि मी एकनाथ शिंदे यांना समर्थन देतो आहे.
- काही परिस्थितीनुसार मला हा निर्णय घ्यावा लागतोय, म्हणून मी तो घेतोय असंही मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सांगितलं आणि त्यामुळे त्यांचं समाधान झालेलं आहे.
- आजपासून मी एकनाथ शिंदे यांचं समर्थन करत आहे.