मुक्तपीठ टीम
प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगमनेर आणि पुण्यातील एका कंपनीच्या, महाराष्ट्रातील ३४ ठिकाणच्या विविध कार्यालयांवर शोध मोहीम आणि जप्तीची कारवाई केली आहे. या मोहिमेत २४३ कोटी रुपयांच्या बेहिशेबी रोख तंबाखू विक्री झाल्याचे उघडकीस आले आहे. या बेकायदा विक्री व्यवहारात नेमके कोण सहभागी आहेत, त्याचाही शोध घेतला जात आहे. आतापर्यंत या मोहिमेत ३३५ कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न आढळले आहे.
या कंपन्या, तंबाखू आणि त्याच्याशी संबधित उत्पादनांची निर्मिती, पॅकेजिंग आणि विक्री तसेच ऊर्जावितरण, एफएमसीजी आणि बांधकाम व्यवसायांशी संबधित आहेत. या शोध मोहिमेत, हस्तलिखित आणि कॉम्युटर वरील एक्सेल शीट्स मध्ये असलेल्या हिशेबांमध्ये २४३ कोटी रुपयांची बेहिशेबी रोख तंबाखू विक्री केल्याची माहिती आढळली. त्याशिवाय, काही तंबाखू उत्पादनांशी संबधित व्यवहारांची चौकशी करतांना, आणखी सुमारे ४० कोटी उत्पादनांची बेहिशेबी विक्री केल्याचेही आढळले.
हे व्यावसायिक, बांधकाम व्यवसायाशी संबंधित व्यवहारांमध्ये नोंदणीकृत किमतीपेक्षा अधिक रोख रक्कम स्वीकारत आणि देत असल्याचेही लक्षात आले आहे. यासंदर्भात १८ कोटी रुपयांचे रोखीचे व्यवहार झाल्याचे पुरावे आढळले आहेत. प्राप्तिकर कायदा १९६१ च्या कलम ५०-सी चे उल्लंघन केल्याप्रकरणी, २३ कोटी रुपयेही आढळले आहेत.
या शोध मोहिमेदरम्यान बांधकाम खरेदी विक्रीच्या बेहिशेबी व्यवहारांमध्ये ९ कोटी रुपयांचा नफा झाल्याचे या व्यावसायिकाने मान्य केले. एक कोटी रुपये इतकी बेहिशेबी रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत या मोहिमेअंतर्गत, ३३५ कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न आढळले आहे. याप्रकरणी पुढचा तपास सुरु आहे.