मुक्तपीठ टीम
ऐरोली येथे एका १२ वर्षीय मुलाचा तीव्र विजेचा धक्का लागल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्घटना ऐरोलीच्या सेक्टर ७ मधील शिवशंकर प्लाझा २ मधील दुकान क्रमांक ७ समोर सकाळी घडली. घटनास्थळी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
सदर मुलगा रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आलेल्या लोखंडी शिडीच्या संपर्कात आला होता. ही शिडी विजेच्या उघड्या तारेला स्पर्श करीत होती. त्यात चालू असलेल्या उच्च व्होल्टेजमुळे काही सेकंदातच मुलाच्या शरीराला आग लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकाराची माहीती देताना रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश गावडे यांनी, “मृत मुलाची ओळख अद्याप पटलेली नाही. तो मुलगा फुटपाथवरच राहत असल्याचे सांगितले जात आहे. आम्ही त्याचा कुटुंबियांचा शोध घेत आहोत. तसेच एवढी मोठी लोखंडी शिडी तिथे का ठेवली गेली याचीही चौकशी केली जात आहे. या प्रकरणी कुणी दुर्लक्ष केल्याचे समोर आले तर त्यावर कडक कारवाई केली जाईल, असे सांगितले.
हलगर्जीपणाबद्दल कारवाईची मागणी
सामाजिक कार्यकर्ते बापू पोळ म्हणाले की, “तो मुलगा रहदारीच्या सिग्नलवर खेळणी विकत असे. अशा प्रकारे शिडी ठेवणे ही एक मोठी बेजवाबदारी आहे. आम्ही यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. तसेच या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली जावी”.
महावितरणची सारवासारव
या दुर्घटनेनंतर नवी मुंबईत वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “२१ फेब्रुवारीला दिवा फीडरवरील दिवा गावात लेन्सकार्टच्या दुकानासमोर असलेली शिडी कोणी तरी विद्युत तारांना जोडली होती. त्यामुळे त्यात ११ केव्ही करंट चालू होता. २२ फेब्रुवारीला, सकाळी ८.५२ वाजता दिवा फीडर ट्रीप झाला. सदर पीडिताने शिडी धरली होती आणि चप्पल घातली नव्हती, त्यामुळे मुलाला विजेचा धक्का लागला”.