मुक्तपीठ टीम
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सध्या धक्क्यावर धक्के बसत आहेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत वेगळी वाट चालली. त्यांनी भाजपासोबत राज्यात सरकार बनवलं. त्यांच्यामागोमाग आमदार, खासदार आणि पदाधिकारीही शिवसेना सोडत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हे बंडखोरीचे धक्के बसत असतानाच आता भाजपानेही धक्के देण्यास सुरुवात केली आहे. नंदुरबारमधील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे यांनी त्यांच्या समर्थक नगरसेवकांसह हाती कमळ घेतलं आहे.
शिवसेनेचे ४० आमदार फोडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १२ खासदारांनाही आपल्याकडे वळवले. त्यामुळे राज्याच्या विधानसभेत आणि लोकसभेत त्यांच्या गटालाच विधिमंडळ आणि संसदीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. त्यानंतर ते सध्या शिवसेनेच्या संघटनात्मक पदाधिकाऱ्यांना फोडू लागले आहेत. शिवसेनेत एकनाथ शिंदेंकडून फोडाफोडी सुरु असतानाच आता भाजपानेही थेट धक्के देणे सुरु केले आहे.
नंदुरबार जिल्हा शिवसेना प्रमुख डॉ.विक्रांत मोरे, नगरसेविका शोभाताई मोरे, नगरसेवक अर्जुन मराठे, नगरसेवक मिलिंद बाफना यांनी शनिवारी पनवेल येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. याच वेळी पलूस (जि. सांगली ) येथील उद्योजक आणि सुमारे १०० काँग्रेस कार्यकर्त्यांनीही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय प्रभारी खा.सी.टी.रवी, प्रदेश सरचिटणीस आ.श्रीकांत भारतीय, केंद्रीय प्रवक्त्या खा.डॉ.हीना गावित, माजी मंत्री आ.विजयकुमार गावित, सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.