उदयराज वडामकर / कोल्हापूर
पुरेपुर कोल्हापूर…सहजच तोंडी येतं ते काही उगाच नाही. निसर्गानंही कोल्हापूरला भरभरून दिलंय. आता पावसाळ्यात धबाधबा कोसळतानाच सौंदर्याची लयलूट करणाऱ्या धबधब्यांचंच पाहा. त्यातही राऊतवाडीसारख्या धबधब्यांचं पाणी तर अगदी दुधाासारखं पांढर स्वच्छ दिसतं. त्यामुळे पर्यटकांचे पाय तिथं वळतातच वळतात.
पावसाळा सुरू झाला की हौशी पर्यटनासाठी पाय वळतात ते राधानगरी जवळील राऊतवाडी धबधब्याकडे. वर्षा पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी तिथं बरंच काही आहे. या निसर्गरम्य वातावरणात पर्वतरांगांच्या कुशीतून ओघळणारे दुधासारखं पांढरं स्वच्छ पाणी नजर खिळवून ठेवतं. तसंच डोंगरमाथ्यांवरून पायथ्याशी झेपावणारे धबधबे पर्यटकांना जणू सादच घालत असतात .
हौशी पर्यटक अशा धबधब्याच्या शोधातच असतात. कोकणात नागमोडी वळणे घेत गर्द झाडीतून पर्वत कपारीतून पर्यटक अंबोली नापणे, राऊतवाडी तसेच न्हावणकोंडा ,बकीॅ या धबधब्याकडे आकर्षित होत असतात.
कोल्हापूरपासून ४०ते ४५ किलोमीटर अंतरावर असणारा राऊतवाडी धबधबा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. राऊतवाडी धबधब्यापासून काही अंतरावर पर्यटक आपली गाडी पार्क करून धबधब्याच्या उडणाऱ्या तुषारांत भितत बागडतात. कोसळणाऱ्या पाण्याचा आवाजाच्या तालावर पर्यटकांची निर्व्याज मस्ती चालते.
धबधब्यातून पडणारे पाणी पर्यटकांना जणू आपल्या आवाजाने सादच घालत असतं. राऊतवाडी धबधब्याच्या ठिकाणी जवळच खाऊच्या टपऱ्याही टपऱ्यामध्ये उकडलेली कणसे भाजलेली कणसे आदि दुकाने थाटल्यामुळे पर्यटकांना त्याचा स्वाद घेत धबधब्याच्या वर्षानंदा त लुटण्यासाठी अनेक पर्यटक राऊतवाडी कडे आकर्षित होत आहेत.