हेरंब कुलकर्णी
प्रिय रणजित डिसले,
तू राजीनामा दिल्याची बातमी काल पेपरात वाचली .
खूप आनंद झाला.
बरे झाले तू आमच्या व्यवस्थेतून बाहेर जाण्याचा निर्णय घेतलास..
अन्यथा तुला सळो की पळो आम्ही करणारच होतो….
.आणि काय करायचे बाकी ठेवले….?
एका जागतिक दर्जाच्या शिक्षकाला राज्यातील सर्वात मोठा गुन्हेगार शिक्षक म्हणून बदनाम केले….
आणखी खूप काही करू शकतो
आमच्या या व्यवस्थेत तुझ्यासारखे लोक आम्हाला नकोच आहेत…
इतके दिवस तुला आम्ही व्यवस्था म्हणून सांभाळले.
हेच तू तुझे नशीब समज.
राज्यात लाखो कर्मचारी काम करतात.
इतर लोक जसे आपली नोकरी भली की आपण भले असे जगतात अशा स्थितीत आपण कोणीतरी शहाणे आहोत असे समजून थेट जागतिक पुरस्कार मिळवला
आणि त्या धक्क्यातून आम्ही सावरतो ते कमी की काय ?अमेरिकेतील फुल ब्राईट शिष्यवृत्ती मिळाली
…हे जरा अतीच झालं
एका खेडेगावात या वाडीवर काम करणाऱ्या शिक्षकाने इतकी उंच उडी मारणे आम्हाला अजिबात आवडले नाही..
पण जागतिक पुरस्कार असल्यामुळे आम्ही तुझा सत्कार केला ,कौतुक केले पण तुझे जागतिक उद्योग सुरूच राहिले तेव्हा मग नाईलाजाने आम्हाला तुला आमचा परिचय द्यावा लागला…
व्यवस्था म्हणून आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत.
आमच्यापुढे कोणीच मोठे नाही…
जो जो या व्यवस्थेच्या आकारात मावला नाही
त्याला त्याला आम्ही कापून मापात बसवले…
आणि जे नीट आकारात आले नाहीत त्यांना आकारविहित करून टाकले..
गो.रा. खैरनारपासून असे व्यवस्थेने आकार दिलेले खूप अधिकारी आहेत…
बदल्या करून नीट केलेली यादी तर मोजताच येणार नाही…
हरियाणाचा ३५ बदल्या झालेला प्रसिद्ध अधिकारी तर हिमनगाचे टोक आहे…
वेगळेपण दाखवणारे कितीतरी शिक्षक अधिकारी कर्मचारी आम्ही असेच सुधारून टाकले…बदल्या,प्रशासकीय चौकशी,वेतनवाढ बंद,निलंबन हे तर आमच्या हातचे मळ आहेत….
पेशंट बघून मग आम्ही उपचार ठरवत असतो…
शेवटी व्यवस्था अमर आहे…
रणजित तू कदाचित आम्हाला सांगशील तू निर्दोष आहेस.
कदाचित तू आम्हाला पटवून देशील की तू सगळे नियमात राहून काम केलेस,
तू सगळे पुरावेही सादर करशील
पण आमचे मूळ दुखणेच वेगळे आहे.
तू तिथे जात होतास की नाही, हा मुद्दाच नाही
तू व्यवस्थेपेक्षा मोठा झालास
आम्हाला ओलांडून पलीकडे गेलास…
आमच्या वरिष्ठांशी जवळीक केलीस…
मंत्री तुला ओळखू लागले हाच तुझा गुन्हा आहे
जो जो असे आम्हाला ओलांडून पलीकडे जाईल त्याची हीच हालत होईल
तुझा आम्ही हजेरीचा मुद्दा काढला
दत्तात्रय वारेंचा परवानगी न घेतल्याचा असेल
युवराज घोगरे चा वेगळाच असेल
निमित्त कोणतेही काढू …
कधीकधी दोष नसेल तरी आम्ही काढू
कारण व्यवस्था सलामत तो
आरोप पचास…..
तेव्हा वेगळं काम करणाऱ्या सर्वाना
तुझा राजीनामा ही चेतावणी आहे…
_ज्याला ज्याला चौकटीबाहेर जायचे आहे
त्याने व्यवस्थेबाहेर जाण्याची तयारी ठेवावी_ …
तू देशाबाहेर जाण्याअगोदर तुला व्यवस्थेबाहेर जायला भाग पाडले हाच आमचा आनंद आहे रणजित
हेरंब कुलकर्णी
8208589195
(हेरंब कुलकर्णी हे शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक आणि कार्यकर्ते आहेत. कोरोना काळात अनाथ झालेली मुलं, वैधव्य आलेल्या महिलांसाठीही ते कोरोना एकल पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक म्हणून सातत्यानं कार्यरत आहेत.)