मुक्तपीठ टीम
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच बीआरओ ही नेहमीच आपल्या कामात तत्पर आणि कर्तबगार असते. बीआरओ सध्याही यामुळेच चर्चेत आहे. अतिशय जबरदस्त कामगिरी बीआरओने बजावली आहे. त्यांनी अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत एका आठवड्याच्या विक्रमी वेळेत अरुणाचल प्रदेशातील कुरुंग कुमे जिल्ह्यात पूल बांधला आहे. बीआरओने बांधलेला बेली ब्रिज नावाचा पूल जिल्ह्यातील कोलोरियांग-ली-हुरी मार्गावर आहे. हा चीनच्या तिबेट प्रदेशाच्या सीमेला लागून आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी आलेल्या भीषण पुरामुळे हा पूल उद्ध्वस्त झाला होता. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. पूल लवकरात लवकर बांधण्यासाठी अनेक नवनवीन तंत्रांचाही वापर करण्यात आला.
प्रकल्प अरुणांकचे मुख्य अभियंता अनिरुद्ध एस कंवर यांनी असेही दिलेल्या माहितीनुसार, ऑफिसर कमांडिंग रोशन आणि रेजिमेंट कमांडर मेजर मोहित यांच्या नेतृत्वाखालील ११९ रोड कन्स्ट्रक्शन कंपनीच्या टीमने अतिवृष्टी असतानाही पूल पुन्हा सुरू करून संपर्क पूर्ववत करण्यासाठी सात दिवस अहोरात्र काम केले.
त्यानंतर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अंतर्गत प्रकल्प अरुणांकच्या कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत पूल बांधला आणि तो पुन्हा सुरू केला. कंवर यांनी सांगितले की, संततधार पाऊस आणि भूस्खलनासह इतर कठीण परिस्थितीमुळे पुलाची पुनर्बांधणी करणे हे आव्हानात्मक काम होते. पुलाच्या उभारणीसाठी सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.