मुक्तपीठ टीम
आपल्या शेतकऱ्यांसाठी बैल म्हणजे पोटच्या लेकरासारखाच मायेचा. पण वर्षानुवर्षे शेतीमाल वाहणाऱ्या पारंपरिक बैलगाडीला ओढताना बैलांच्या मानेवरच भार पडतो. या जुन्या समस्येवर नव्या संकल्पनेतून मार्ग काढण्यात सांगलीमधील इस्लामपूरच्या आरआयटी महाविद्यालयाची इंजिनीअरिंग टीम यशस्वी ठरलीय.
तरुणाईच्या संशोधक वृत्तीला जर उपयोगीपणाची दिशा दिली तर समाजातील सामान्यांचं भलं होणं नक्की असतं. सांगली जिल्ह्यातील आर.आय.टी.च्या अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी लावलेला बैलगाडीसाठीचा रोलिंग सपोर्ट असाच एक समाजोपयोगी शोध आहे. आर.आय.टी.च्या विद्यार्थ्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीसाठी रोलिंग सर्पोट साधन तयार केलंय. त्यामुले बैलांच्या मानेवर येणारा भार ८०% कमी होणार आहे. तेवढंच नसून या साधनामुळे बैलगाडीला आणखी एका चाकाचा आधारही मिळाल्याने अपघाताचे प्रमाण घटण्याचा फायदा होणार आहे.
आर. आय. टी. महाविद्यालयाच्या ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग विभागाच्या शेवटच्या वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या सौरभ भोसले, आकाश कदम, निखिल तिपायले, आकाश गायकवाड आणि ओमकार मिरजकर या विद्यार्थ्यांनी रोलिंग सपोर्ट साधन तयार केलं आहे. शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना कॅपस्टन प्रोजेक्टसाठी वेगवेगळ्या संकल्पनांवर काम करण्याची संधी मिळते.
त्यांनी चालू घडीला अवघड आव्हानांची निवड करण्याचं ठरवलं. त्यांना जवळच असलेल्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वाहतूकीत बैलगाड्यांना येणाऱ्या समस्या लक्षात आल्या. त्या सोडवण्यासाठी संशोधन करण्याचे या विद्यार्थ्यांनी ठरविले. त्यांनी सारथी या नावाने आपला प्रोजेक्ट पूर्ण केला.
महाराष्ट्रातील सर्व भागांमध्ये सहकारी आणि खासगी मालकीचे एकूण जवळपास २०० साखर कारखाने आहेत. त्यातील बहुतांश साखर कारखान्यासाठी साधारणतः ३०० बैलगाडया जवळच्या भागातून ऊस वाहतूक करत असतात. या वाहतुकी दरम्यान प्रामुख्याने शेतात ऊस भरताना लावण्यात आलेला लाकडी शिपाई जमीनीत धसणे व मोडणे, बैलांवर अतिभार, रस्त्यांवर स्पीडब्रेकर खड्यांमुळे पाय घसरणे, पाय मुरगळणे व कधी कधी पाय मोडणे अशा वेगवेगळ्या समस्यांना तोंड दयावे लागते. यामुळे बैलाला दुखापत तसेच बैल चालकांचे आर्थिक नुकसान होते.
यावर त्यांनी संकल्पना ठरवत कामाला सुरवात केली. त्यासाठी त्यांनी दोन्ही बैलांच्यामध्ये तिसरे चाक बसवले. हे चाक बैलांवरचा भार कमी करते आणि बैलगाडीसाठी पूर्ण संतुलन देते. हा रोलिंग सपोर्ट बैलांच्या उंचीनुसार कमी-जास्त वर खाली करू शकतो. तसेच याचा उपयोग ऊस भरताना खाली व शेतातून वाहतूक करताना वर अडकवू शकतो. अशाप्रकारे तयार करण्यात आलेल्या प्रोजेक्टचे टेस्टिंग हे ऊस भरताना व रस्त्यावरून वाहतूक करताना करण्यात आले आहे. रोलिंग सपोर्टला आता प्रायोगिक तत्त्वावर उपयोगात आणलं जाईल. या अफलातून संकल्पनेची बैलगाडीचालक, शेतकरी, कारखानदार या सर्वांनी प्रशंसा केली आहे.
शिवाजी विद्यापीठातून रिसर्च निधी अंतर्गत लीड कॉलेज स्कीम अंतर्गत या प्रोजेक्टसाठी १० हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. या रोलिंग सपोर्ट प्रोजेक्टचे पेटेंट मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. प्रोजेक्टसाठी डॉ. सुप्रिया सावंत यांनी मार्गदर्शन केले आहे त्याचबरोबर प्रा. पी. एस. घाडगे व ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एस. आर. कुंभार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी, डॉ. ए.बी. काकडे, डॉ. एल. एम. जुगुलकर, प्रा. सुधीर आरळी आणि प्रा. हर्षल पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव आर डी. सावंत व गव्हर्निंग कौंसिलचे चेअरमन भगतसिंह पाटील यांनी या टीमचे खास कौतुक केले आहे.