मुक्तपीठ टीम
भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई विभागाने भिवंडीतील एखा खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या अॅल्युमिनियम फॉइलच्या कंपनीवर धाड धाड घातली. तेथून माल जप्त करण्यात आला आहे. त्या कंपनीद्वारे गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन करत ISI चिन्हाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.
ठाण्यातील भिवंडी येथे मुंबईच्या पथकाने छापे टाकत जप्तीची कारवाई केली. कंपनीच्या ठिकाणी छापे टाकल्यानंतर, भिवंडीच्या वाल गावातील प्रितेश कॉम्प्लेक्समधील अलका लाईफस्टाईल प्रायव्हेट लिमिटेडने १३ फेब्रुवारी २०२०रोजी जारी करण्यात आलेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केलेले आढळले. यावेळी आयएस १५३९२ नुसार १२ इंच आकाराचे २७००पेक्षा जास्त अॅल्युमिनियम फॉइल जप्त करण्यात आले.
गैरवापरास कडक शिक्षा
भारतीय मानक ब्युरोच्या मानक चिन्हाचा गैरवापर केल्यास भारतीय मानक ब्युरो कायदा २०१६ नुसार दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा किमान २ लाख रुपये दंडाची किंवा दोन्ही प्रकारच्या शिक्षा होऊ शकतात.या कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.ही छापे आणि जप्तीची कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पथकामध्ये सायंटीस्ट – C पदावरच्या निशिकांत सिंह आणि आशिष वाकळे यांचा समावेश होता.भारतीय मानके १५३९२नुसार “ खाद्यपदार्थ पॅकेजिंगसाठी अॅल्युमिनियम आणि अॅल्युमिनियम मिश्र धातु बेअर फॉइल” वरील गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन तपासण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली होती.
बनावट आयएसआय चिन्हांकित उत्पादने तयार करून ग्राहकांना मोठ्या नफ्यासाठी विकली जात असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे. खरेदी करण्यापूर्वी http://www.bis.gov.in या भारतीय मानक ब्युरोच्या संकेतस्थळाला भेट देऊन उत्पादनावर आयएसआय चिन्हाची सत्यता तपासावी अशी विनंती सर्वाना करण्यात येत आहे.
नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांना कोणत्याही उत्पादनावर आयएसआय चिन्हाचा गैरवापर केल्याचे आढळल्यास,ही माहिती प्रमुख ,एमयुबीओ -II, पश्चिम क्षेत्रीय कार्यालय, भारतीय मानक ब्युरो, दुसरा मजला, एनटीएच (WR), प्लॉट क्रमांक एफ -१०, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व ), मुंबई – ४०००३९.येथे कळवावी. hmubo2@bis.gov.in या पत्त्यावर ई-मेलद्वारेही अशा तक्रारी करता येतील. अशा माहितीचा स्रोत गोपनीय ठेवला जाईल