मिक्तपीठ टीम
‘पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक पटकाविल्याने आत्मविश्वास दुणावला असून येत्या काळात अधिक परिश्रम करेन व महाराष्ट्रासह देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावेन’, असा विश्वास कुस्तीपटू श्रावणी लव्हटे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रात व्यक्त केला.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याच्या कौताली येथील १५ वर्षाच्या श्रावणीने बेहरीन येथे नुकत्याच पार पडलेल्या एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेत ३६ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकाविले असून ती आज दिल्लीत परतली. श्रावणीच्या या यशानिमित्त महाराष्ट्र परिचय केंद्रात आज तिचा छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. उपसंचालक अमरज्योतकौर अरोरा यांनी पुष्पगुच्छ देवून श्रावणीचे अभिनंदन केले. यावेळी उपसंपादक रितेश भुयार, कुस्तीपटू पल्लवी खेडकर उपस्थित होते. यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान श्रावणीने आपल्या उपलब्धीविषयी व कुस्ती क्रीडा प्रकारातील प्रवासाविषयी माहिती दिली.
बेहरीन देशाच्या मनामा या राजधानीत २ ते ४ जुलै २०२२ दरम्यान एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेत श्रावणीने सहभाग घेतला. १५ वर्षाखालील फ्रिस्टाईल कुस्तीच्या ३६ किलो वजनी गटात श्रावणीने पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशासाठी रौप्यपदक पटकाविले. या स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर लखनऊ (उत्तर प्रदेश) येथे १५ ते ३० जून २०२२ दरम्यान राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेवून श्रावणीने थेट बेहरीन गाठले व पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविले. प्रशिक्षक संदीप पाटील यांचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळेच हे यश संपादन करू शकल्याची भावना यावेळी श्रावणीने व्यक्त केली.
श्रावणीचे वडील महादेव लव्हटे हे भाजी विकून कुटुंबाचा निर्वाह करतात व याकामी तिची आईही हातभार लावते. कुस्तीपटू चुलतभाऊ प्रसाद व आतेभाऊ विकास यांच्याकडून प्रेरणा घेवून वयाच्या ११व्या वर्षापासूनच श्रावणी कुस्ती क्रीडा प्रकाराकडे वळली. सहावीत असतानाच तालुका व जिल्हास्तरावरील कुस्ती स्पर्धेत भाग घेवून तिने सुवर्ण पदक पटकाविले. यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेत ४ तर राष्ट्रीय स्पर्धेत २ सुवर्ण व २ कांस्यपदक पटकावून श्रावणीने यशाचा आलेख उंचावत ठेवला. १५ व्यावर्षीच देशाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक मिळवून देणाऱ्या श्रावणीला अधिक मेहनत करून व विजयातील सातत्य राखत आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूर, महाराष्ट्र आणि भारत देशाचे नाव उंचवायचे आहे.