तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
नुपूर शर्मा या भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या. त्यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित मोहंमद पैंगबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यांच्याविरोधात भारतातच नव्हे तर जगभर निषेधाची लाट उसळली. भाजपानेही अखेर त्यांच्यावर कारवाई केली. राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका टेलरने जीव गमावला. दहशतवादी प्रवृत्तीने त्याचा बळी घेतला. अमरावतीतही उमेश कोल्हे यांची हत्या याच कारणाने झाल्याचा वाद सुरु आहे. काही सैतानांना अमानुषतेची क्रूर संधी मिळाली. नुपूर शर्माच्या उजव्या बरळण्यामुळे पेटलेला वाद जीवेघेणा ठरत असतानाच आता अभिव्यक्तीच्या नावाखालील स्वैराचाराची एक डावी विकृती समोर आली आहे.
हे स्वातंत्र्य की स्वैराचार?
डाव्या विचारांच्या लीना मनिमेकलाई यांनी आपल्या लघुपटासाठी बनवलेल्या पोस्टरवर काली मातेला एका हाताने धूम्रपान करताना तर दुसऱ्या हातात एलजीबीटी कम्युनिटीचा झेंडा घेतलेले दाखवले आहे. स्पष्ट सांगायचं तर यात अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा काहीही करा आणि चर्चेत राहा या प्रवृत्तीतून घडवलेला स्वैराचार दिसतो आहे.
समाजात द्वेषाची आग भडकवणं ही कसली अभिव्यक्ती?
अभिव्यक्ती ही शेवटी काही मनातल्या मनात मांडण्यासाठी नसते, ती समाजासाठी असते. त्या समाजातच विनाकारण विखार पसरेल असं जाणीवपूर्वक काही करायचं आणि चर्चेत राहायचं, असा काहींचा धंदेवाईक फंडा असतो. त्याला अभिव्यक्तीच्या नावाखाली महिमामंडित करण्याचा प्रयत्नही तशा बेजबाबदार स्वैराचाऱ्यांकडून आणि त्यांच्या कंपूंकडून केला जातो. कधी ते नुपूर शर्मांसारखे उजवे असतात तर कधी या लीना यांच्यासारखे डावे! पण शेवटी समाजात विखार पसरवणं, द्वेषाची आग भडकवणं हा एक सामाजिक गुन्हा आहे. कुणाच्यातरी जाणीवपूर्वक भावना भडकावणं हे खरं पाहता पापच. ते करणारे कुणीही असले तरी त्यांचा बचाव कुणी म्हणजे कुणीच करू नये. कारण कलाकार जेव्हा तसं करतात तेव्हा ते जास्त खटकतं. कारण कलाकार हे संवेदनशील मानले जातात. आणि समाजात द्वेष भडकवणं हे संवेदनशीलतेचे नाही तर असंवेदनशीलतेचे लक्षण आहे.
पुढील मुद्दे मांडण्याच्या आधी लीना मनिमेकलाई कोण ते जाणून घेणं महत्वाचं आहे.
लीना मनिमेकलाई कोण आहेत?
- लीना मनिमेकलाई या तामिळनाडूतील लघूपट निर्मात्या आहेत.
- तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित डाव्या विचारांच्या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
- सध्या त्या कॅनडात स्थायिक आहेत.
- त्या त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात दीर्घकाळापासून असंतोषाचा आवाज उठवण्यासाठी ओळखल्या जातात.
- त्यांच्या चित्रपटांना पुरस्कारानी गौरविण्यातही आले आहे.
- पण त्याचवेळी वाद आणि लीना यांचं जवळचं नातं राहिलं आहे, अशी टीकाही होते.
- अश्लीलता, अश्लील भाषा आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांवर परिणाम होण्याची भीती या कारणामुळे त्यांचा पहिला चित्रपट सेंगदाल सुरुवातीला सेन्सॉर बोर्डाने मंजूर केला नव्हता.
- नुकत्याच आलेल्या Maadathy – An Unfairy Tale या चित्रपटालाही सेन्सॉरकडून मान्यतेसाठी झगडावं लागलं.
त्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सहभागी होत आल्या आहेत.
वाद भडकवा आणि प्रसिद्धीची पोळी भाजा!
लीना यांच्याविषयी ही सर्व माहिती मुद्दामच दिली. त्या काही कुणी अविचारी माथेफिरू नाहीत. पण तरीही देशात मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे एक वाद सुरु असतानाच त्यांनी हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावतील, असे काही करणे अपेक्षित नव्हतेच नव्हते. तरीही त्यांनी ते केले. त्यामुळे त्यांनी ते जाणीवपूर्वक वाद माजवण्यासाठीच केले हे उघड आहे. काहींचा उद्देश हा अभिव्यक्तीएवढाच वाद भडकावून त्यावर प्रसिद्धीची पोळी भाजण्याचाही असतो. मग विचार कोणतेही असो. समाजहिताला आग लावत स्वत:चा स्वार्थ साधण्याचा अविचार करणाऱ्या अशा अपप्रवृत्ती सध्या बोकाळत आहेत. कुठेतरी यांना आवर घालणेच नव्हे तर स्वातंत्र्याच्या नावाखालील त्यांचा स्वैराचार रोखणेही गरजेचेच आहे. कारण अशांमुळेच नको ती नियंत्रणं वाढवण्याची संधी सर्वच राजकारण्यांना मिळण्याचा धोका असतो.
अभिव्यक्तीच्या हक्का बरोबर कर्तव्यही!
मुळात अभिव्यक्त होताना महत्वाचं असते ते आपला संदेश, आपले विचार समाजापर्यंत आपण जी प्रतिकं वापरतो, ती विचारपूर्वक निवडली पाहिजेत. त्यांची मांडणी समाजातील कोणत्याही वर्गाच्या भावना दुखावणारी असू नये याची काळजी घेण्याची जबाबदारी ही अभिव्यक्त होणाऱ्या प्रत्येकाचीच असलीच पाहिजे. पण तसं घडत नाही. किंवा जाणीवपूर्वक बिघडवले जातं.
महाराष्ट्राबद्दलचा न्याय दिला तेव्हा आदरणीय, नुपूर शर्मांना झोडतातच टीकेची झोड!
ज्या न्यायाधीशांचे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील निकालाबद्दल दाखले दिले गेले. त्याच न्यायाधीशांनी नुपूर शर्माला योग्य तडाखे देताच त्यांच्याविरोधात मोहीम सुरु झाली. त्यात निवृत्त अधिकारी, न्यायाधीशही सहभागी दिसतात. काय हे! किती दुटप्पीपणा!!
नुपूर शर्मांनंतर लीना यांच्याबाबतीतही तसंच वाटतंय. आता परीक्षा डाव्यांची आहे.
पुन्हा आता काहींकडून या पोस्टरचे कलाकाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून समर्थन केले जात असेल, तर मग नुपूर शर्मांसारख्यांना विरोधाचा हक्कही आपण गमावतो. अप्रत्यक्षरीत्या द्वेष माजवणाऱ्या प्रवृत्तींचंच तुम्ही अप्रत्यक्ष समर्थन करता, हे विसरू नये.
किमान अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्व ओळखणाऱ्यांनी स्वैराचारी प्रवृत्तींना साथ देणं टाळलंच पाहिजे. मग त्या उजव्या असो की डाव्या. अप्रवृत्ती ही अप्रवृत्तीच. मग ती नुपूर असो वा लीना. उजवी असो की डावी. अशांच्या स्वैराचारामुळे धोका अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाच आहे. प्रवृत्ती टपलेल्या आहेत. सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे.
मुक्तपीठकडे ते पोस्टर उपलब्ध आहे, इतर माध्यमं दाखवतही आहेत, तरीही आम्ही त्यातून भावना दुखावल्या जाण्याचा धोका असल्याने ते लेखासोबत वापरलेले नाही.
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात. संपर्क: ९८३३७९४९६१, ७०२११४८०७०, muktpeethteam@gmail.com )