मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विश्वासदर्शक ठरावावरील भाषण हे काहीसं पठडीबाहेरचं होतं. आपल्या भाषणात बोट अपघातात गमावलेली मुलांच्या आठवणीनं डोळ्यात पाणी आणि धर्मवीर आनंद दिघेंविषयीची कृतज्ञता व्यक्त करताना दिसलेला भावूकपणा आणि हिंदुत्वावर ठाम राहण्याचा करारीपणा दाखवणारा होता. त्यांच्यावर झालेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी महाराष्ट्रातील सामान्य माणसांसाठी करून दाखवण्याचा निर्धार व्यक्त केला. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राची घोषणा टाळ्या मिळवणारी ठरली.
मुख्यमंत्र्यांच्या महत्वाच्या घोषणा
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात महत्वाच्या घोषणा केल्या.
- आम्ही शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र घडणार.
- रायगड जिल्ह्यातील हिरकणी गाव वाचवण्याकरता २१ कोटींचा निधी मंजूर केला.
- पेट्रोल-डिजेलवरील वॅट कमी करण्याचा निर्णय नवं सरकार कॅबिनेटमध्ये लवकरच करेल.
- या घोषणांसाठी आवश्यक निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येणार आहे.
राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर लवकरच कमी करणार!
- महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलवरचा कर लवकरच कमी करण्यात येईल.
- केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरचा कर कमी केला, तशाच प्रकारचा निर्णय आता राज्यातही घेतला जाईल.
- आता राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात येईल.
- त्यामुळे त्याचा फायदा हा राज्यातील जनतेला होणार आहे.
शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निश्चय
शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निश्चय राज्य सरकारने केला असून राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.विधानसभेत विश्वासदर्शक ठरावानंतर अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाषणाच्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी २१ कोटी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रायगड पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी २१ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. या निधीतून हिरकणी गावाचा सर्वांगीण विकास साधला जाईल. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी इंधनावरील कपात केली त्याच धर्तीवर राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
आगामी कालावधीत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून साकारत असलेल्या समृद्धी महामार्गातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होवून राज्याच्या विकासाला चालना मिळेल. मुंबईतील मेट्रो प्रकल्पाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. मेट्रो प्रकल्प गतीने पूर्ण करण्याकडे राज्य शासनाचे प्राधान्य असेल. राज्यातील सर्व प्रलंबित प्रकल्पांच्या कामांना गती देणार आहेत. तसेच शासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे एकांगी निर्णय न घेता सर्वांच्या हितासाठी शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
राज्य शासन सर्वांना बरोबर घेवून सर्व धर्मियांना समन्यायाने वागणूक देणार असून सर्वांच्या विकासासाठी हे शासन काम करेल. राज्यातील सर्व प्रलंबित प्रकल्पांची कामे मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचा सच्चा सैनिक म्हणून मी काम करणार आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी तत्काळ निर्णय घेवून सर्वसामान्यांची कामे लवकर होण्यासाठी आमचे सरकार भर देणार असून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहोत.