उदयराज वडामकर / कोल्हापूर
मुखी विठ्ठल
मनी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल
सर्वत्र विठ्ठल
बळीराजाची पावलं आता शिवारातून पंढरपुराकडे वळू लागलीयत. अवघ्या महाराष्ट्रातूनच नाही तर बाहेरूनही वारकऱ्यांना ओढ लागलीय विठूरायाची. गावागावातून निघालेल्या पालख्यांचा उदयराज वाडिमकरांचा खास रिपोर्ट.
आषाढी एकादशी जवळ आली की वारकरी सारं विसरतात. त्यांना ओढ लागते ती फक्त आणि फक्त विठुरायाच्या दर्शनाची. इंद्रायणीच्या तिरी वसलेल्या विठ्ठल मंदिरात ते मनानं कधीच पोहचलेले असतात. त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यात तसे तर वर्षभर विठुराय रखमाईसह वसलेले असतात. पण मुखी ग्यानबा तुकारामाचा गजर करत पंढरपुरात जायचं आणि एकादशीला डोळ्यात विठुरायाला साठवून घ्यायचं, ते सुख वेगळंच. त्यासाठीच सारं सारं मागे सारत वारकरी पंढरीकडे निघतात…
कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी वस्ती तील वारकरी विठुरायाच्या भेटीकरीता आतुरलेले आहेत. पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरती त्यांची रिघ लागलीय.
वारकरी म्हटले की टाळ,विना, मृदंग, गळ्यात तुळशी माळ,कपाळी टिळा , खांद्यावर पताका, आणि डोकीवर तुळशी कट्टा .चोपदार, मुखी पांडुरंग नामस्मरण म्हणजे वारकरी. आषाढी एकादशी जवळ आलीय. बळीराजाही आपली शेतीची कामे उरकून निघालाय. आता त्याला विठू रायाचे वेध लागलेयत. वारकऱ्यासह तमाम भाविकांना पंढरीच्या विठुरायाचे वेध लागले आहेत.
कोल्हापुरातील सांगवडे व सांगडेवाडी या ठिकाणचे गावकरी व वारकरीही निघालेयत. आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी या गावांची दिंडी निघालीय. भगव्या पताका मृदंग विणेच्या मंगल ध्वनीत आणि विठू माऊलीचा गजर करत वारकरी उत्साहात दिंडीमध्ये सामील झालेयत.