मुक्तपीठ टीम
जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर प्रयत्नांना यश मिळतच मिळत. रत्नागिरी तालुक्यातील उक्षी गावचे सुपुत्र सुधीर घाणेकर यांची संघर्षगाधा अशीच आहे. चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर सुधीर घाणेकर यांच्या “ऑस्करची गोष्ट” या लघुचित्रपटाची युकेच्या लिफ्ट ऑफ फिल्म फेस्टिव्हल तसेच सिनेमेकिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये १७१ देशामधून आलेल्या लघुचित्रपटांमध्ये निवड झाली आहे. त्यामुळे रत्नागिरीच्या या तरुणाच्या लघुपटाने युकेत मोठी झेप घेतली आहे.
प्रतिकूल परिस्तिथीवर मात करत अभिनयाच्या जोरावर आज सुधीर घाणेकर यांना मोठं यश मिळालं आहे. सुधीर घाणेकर यांचे वडिल हे शेतकरी आहेत. आई- वडील, तीन भावडांचं त्यांचं कुटुंबं आहे. सुधीर यांनी रात्रीच्या शाळेत शिकत आपलं प्राथमिक शिक्षण उक्षी आणि माध्यमिक शिक्षण पोचरी शाळेत पुर्ण केले. शाळेच्या वार्षिक महोत्सवात कधी कृष्णाचा अवतार तर कधी नमनात पेंद्या, गौळण बनून ते आपली कला लोकांसमोर सादर करायचे. परेलच्या एमडी कॉलेजमध्ये बी कॉम पर्यंत त्यांनी शिक्षण पूर्ण केले.
अभिनयात काहीतरी वेगळं करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं आणि ते साकारही केलं. “ऑस्करची गोष्ट” या लघुपटात सुधीर यांनी दिग्दर्शक, लेखक, कलादिग्दर्शक, वेशभूषा, कॅमेरामन, कास्टिंग, पोस्ट प्रॉडक्शन अशा अनेक भूमिका सांभाळल्या. या लघुपटाचे संपुर्ण चित्रिकरण स्मार्टफोनवरुन करण्यात आले आहे. सुधीर यांचं ‘सताक्षी 18 क्रिएशन’ नावाचं प्रॉडक्शन हाऊस देखील आहे. “ऑस्करची गोष्ट” हा लघुचित्रपट विविध राजकीय आणि आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात सादर करण्यात आला.
कोण सुधीर घाणेकर?
- सुधीर घाणेकर यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९९२ रोजी रत्नागिरी तालुक्यातील उक्षी गावात झाला.
- त्यांनी कोकणातील प्रसिद्ध अशा नमन या लोककलेपासून अभिनयाची सुरुवात केली.
- “पेनल्टी” या चित्रपटातून सुधीर घाणेकर याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
- कलर्स मराठीवरील “साज नवा, रंग नवा”, “अस्स् सासर सुरेख बाई”, “राधा प्रेम रंगी रंगली” आणि कलर्स गुजराती वाहिनीवरील “प्रीत पिऊ ना पन्नाबेन”, “कुमकुम ना पगल्या पाडा” या वाहीनीत काम केले आहे.
- सोनी मराठी वाहिनीवरील “इयर डाउन”,”श्रीराम समर्थ” या मराठी चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल आहे.
- “संकल्प” आणि “स्त्री & पुरुष” या लघुपटात क्रिएटीव्ह दिग्दर्शक म्हूणन काम केले आहे.
- सुधीर घाणेकर यांनी “फुंकर”, “पटरी बॉइज”, “श्रीराम समर्थ ” या चित्रपटात अभिनेता म्हणून काम केले आहे.
युकेच्या लिफ्ट ऑफ फिल्म फेस्टिव्हल व सिनेमेकिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलची तिसरी आणि अंतिम फेरी युकेतील पाईनवुड स्टुडिओमध्ये ४ जुलै ते १८ जुलै २०२२ पर्यंत आहे. त्यामध्ये सुधीर घाणेकर यांची “ऑस्करची गोष्ट” शॉर्टफिल्मचे सादरीकरण होणार आहे. सुधीर यांना त्यांच्या गावातील मंडळींनी नेहमीच मदत केली. तसेच मित्रमंडळी व परिवार यांचीही मोलाची साथ लाभली.