मुक्तपीठ टीम
कोकणात सुंदर निसर्ग संपदा आहे, मात्र विकासाच्या नावाखाली जंगले आणि पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणात मत्स्य व्यवसाय, पर्यटन, बंदरे विकास यामध्ये राज्य सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना केंद्राने अधिक मदत करावी असे सांगितले. ते आज नीती आयोगाच्या सहाव्या बैठकीत बोलत होते. ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “समुद्र किनारे आहेत त्यामुळे पर्यटन वाढत आहे, जंगले तोडून मोठमोठे रस्ते होत आहेत, पण पर्यावरणपूरक विकास झाला पाहिजे असे माझे मत आहे. केंद्राच्या सागरमाला योजनेत राज्याला पुरेशी मदत मिळाली तर बंदरांची शृंखला होऊ शकेल. प्रधानमंत्री मस्त्य संपदा योजनेत ४ मोठे मस्त्य बंदर व १९ फिश लँडिंग सेंटर्सच्या प्रकल्पांना मंजुरी मिळावी. राज्यात वैविध्यपूर्ण मस्त्य विकास व्हावा म्हणून प्रयत्न करण्यात येत असून त्यामुळेही मोठ्या प्रमाणावर कोकणात रोजगार निर्माण होईल तसेच पर्यटनही वाढेल”.