सुभाष तळेकर / व्हा अभिव्यक्त!
शिवसेना विधिमंडळ आमदारांमध्ये पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर “मी साहेबांसोबत” अशी शिवसैनिकांची चळवळ चालू झाली आहेत. “ मुंबई डबेवाला असोशिएशन” मुख्यमंत्री मा.उध्दव ठाकरे यांचे सोबत आहे. मुंबईचे डबेवाले शिवसेनेसोबत कालही होते आजही सोबत आहेत, आणि उद्याही सोबतच राहतील!
कारण गेल्या पाच वर्षात शिवसेनेने डबेवाल्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत.
डबेवाल्यांना लोकल रेल्वे स्टेशन बाहेर मोफत सायकल स्टॅन्ड उपलब्ध करून दिले आहेत. चर्नीरोड, ग्रॅटरोड, अंधेरी येथील सायकल स्टॅन्ड पूर्ण होऊन डबेवाले ते स्टॅन्ड वापरत आहेत. तसेच अनेक रेल्वे स्टेशनबाहेर सायकल स्टॅन्डचे काम प्रगती प्रथावर आहे. जशी जागा उपलब्ध होईल तसे ते काम पुढे जाईल.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने डबेवाल्यांना मोफत सायकली वाटण्यात आल्या आहेत. त्यामुळे डबेवाल्यांना काम करण्यासाठी सायकल मोफत उपलब्ध झाल्या.
डबेवाल्यांच्या घराचा प्रश्नाबाबत आघाडी सरकारच्यावतीने महत्वाच्या बैठका मंत्रालयात पार पडल्या. जवळ जवळ डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न हा अंतिम टप्यापर्यंत पोहचला आहे. लवकरच तो प्रश्न मार्गी लागेल. डबेवाल्यांना मुंबई महानगर पालिकेच्यावतीने वांद्रे या ठिकाणी डबेवाला भवनसाठी जागा देण्यात आले.
डबेवाल्यांच्या आरोग्याबाबत मुंबई महानगर पालिका सभागृहाने ठराव पारीत केला आहे की डबेवाल्यांच्या उपचारासाठी मुंबई महानगर पालिका रूग्णालयात विशेष कक्ष असावा. लकरच या ठरावाची अंमलबजावणी होईल अशी आशा आहे. गेल्या पाच वर्षात आश्वासनांची पूर्तता करण्याचा प्रामणिक प्रयत्न शिवसेनेकडून झाला आहे.
तसेच मुंबईत मराठी अस्मिता जपण्याचे काम शिवसेनेने केले आहे. मराठी माणसाच्या अस्मितेशी शिवसेनेची नाळ जोडली गेली आहे. आम्ही ही मराठी आहोत म्हणुन “मुंबई डबेवाला असोशिएशन” या अडचणीच्या काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सोबत आहे.
(सुभाष तळेकर हे मुंबई डबेवाला असोशिएशन अध्यक्ष आहेत. मो. 9867221310)