मुक्तपीठ टीम
राज्यात लवकरच नोकर भरती केली जाईल अशी आश्वासनं राज्य सरकार नेहमी देत असतात, मात्र प्रत्यक्षात सरकार वेळकाढूपणा करत असतो. त्यामुळे विविध स्पर्धा परीक्षार्थींचा संताप शिगेला पोहचला आहे. “भीक नाही, मागतोय हक्काची नोकर भरती!” या एकाच भावनेतूून महाराष्ट्रातील तरुणाई रस्त्यावर उतरू लागली आहे. एमपीएससी समन्वय समितीसह अन्य संघटनांनी राज्यव्यापी महाआक्रोश मोर्चांची घोषणा केली आहे. या मोर्चांना स्वाभिमानी विद्यार्थी परिषद आणि संभाजी ब्रिगेडसह अन्य अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
समन्वय समितीच्या निवेदनातून दिलतोय तरूणाईचा संताप…
नवीन सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात नोकरभरती एकतर पूर्णपणे ठप्प आहे किंवा ज्या नोकर भरती झाल्या त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला. अनेक मंत्री फक्त नोकर भरतीच्या घोषणा करताना दिसून येत आहेत. या भ्रामक बातम्या पसरविण्याचे काम राज्यातील मोठी मीडिया हाउसेस करताना दिसून येत आहे, असाही या तरुणांचा आरोप आहे. प्रत्यक्षात कोणतीही मोठी नोकर भरती मागील काही काळापासून सरकारने काढलेली नाही तसेच ज्या हजारो पदांचे अर्ज मागील तीन – चार वर्षांपासून विद्यार्थांनी भरले आहेत त्याही परीक्षा घेण्यास सरकारकडून टाळाटाळ केली जात आहे.
वर्ग-३/४ भरतीसाठी २०१७ साली फडणवीस सरकारद्वारे “महापरीक्षा पोर्टल” ही वेबसाईट स्थापन करून खासगी कंपन्यांद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या, त्यात भ्रष्टाचार झाल्याने नवीन सरकारने महापरीक्षा बंद केले. २०२० रोजी महाविकास आघाडी सरकारने पुन्हा त्याच प्रकारच्या पाच खासगी कंपन्यांना काम दिले. त्यापैकी NYSA कंपनीद्वारे आरोग्य भरतीत पेपरफुटी, GA सॉफ्टवेअर द्वारे म्हाडा आणि TET परीक्षेत पेपरफुटी आणि भ्रष्टाचार करण्यात आला, तसेच MIDC परीक्षा घेतलेली आपटेक ही कंपनी काळ्या यादीत असूनही काम दिले गेले. हा सर्व भ्रष्टाचार MPSC समन्वय समितीने बाहेर काढला होता व आमच्याच अधिकृत पोलीस तक्रारीनंतर विविध पोलीस स्थानकात गुन्हे दाखल झाले. या सर्व गैरप्रकारांमुळे सरकारने या पाच कंपन्यांचे काम काढून TCS/ IBPS/ MKCL या कंपन्यांना दिले परंतु पुन्हा ४ मे २०२२ रोजीच्या नवीन शासन निर्णयानुसार कोणत्याही खासगी कंपनीला काम देऊन जिल्हा निवड समिती परीक्षा घेऊ शकतात असा शासन निर्णय काढला. IBPS/TCS या विश्वासू कंपन्यांना डावलून पुन्हा भ्रष्टाचाराला आवतन दिले गेले. आधीच नोकर भरती ठप्प आहे त्यात भ्रष्टाचारामुळे बेरोजगार नैराश्यात आहेत, त्यामुळे आम्ही राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करत आहोत, ठीक-ठिकाणी शांततेत आंदोलने/ मोर्चे काढण्यात येतील. त्यातील पहिला मोर्चा यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्यात संपन्न झाला. आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात , आपण आमच्या मागण्या लाऊन धराल ही अपेक्षा. आमच्या खालील मागण्या आहेत:
- पेपरफुटी नंतर पोलिसांच्या अहवालानुसार आरोग्य भरतीची गट – क आणि गट – ड परीक्षा रद्द करत फेरपरीक्षा तत्काळ घेण्यात यावी, तसा अधिकृत GR प्रसिद्ध करण्यात यावा.
- २०१९ पासून अर्ज केलेली जिल्हा परिषद भरती सरसकट १३५१४ पदांसाठी, जिल्हा निवड समितीमार्फत येत्या १५ दिवसांत घ्यावी. याचे काम खासगी कंपन्यांना देण्यात येऊ नये, ग्रामविकास विभागाच्या १० मे २०२२ च्या GR मध्ये तसे शुद्धिपत्रक काढण्यात यावे.
- गृहमंत्री मा. दिलीप वळसे यांनी केलेल्या घोषणेनुसार पोलीस भरतीची जाहिरात जून महिन्यात प्रसिद्ध करण्यात यावी.
- महसूल मंत्री मा . बाळासाहेब थोरात यांनी विधान सभेत केलेल्या घोषणेप्रमाणे तलाठी पदांची जाहिरात याच महिन्यात प्रसिद्ध करण्यात यावी.
- २०१८ पासून प्रलंबित शिक्षक भरती पूर्ण करत शिक्षण मंत्र्यानी घोषणा केल्याप्रमाणे यावर्षी नवीन शिक्षक भरतीची TAIT जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी.
- पेपरफुटीवर राजस्थान आणि उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात विशेष कायदा करण्यात यावा.
- परीक्षा लवकर घ्यायच्या आहेत म्हणून आता सर्व सरळसेवा परीक्षा जिल्हा निवड समिती मार्फत घेण्यात याव्या परंतु येत्या काही महिन्यात सर्व वर्ग -३ च्या भरती MPSC मार्फत राबविण्यात याव्या असे नियोजन करण्यात यावे.
आपला स्नेहांकित राहुल कवठेकर
(अध्यक्ष: MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य)
संपर्क 8668378583
Twitter:- @mpsc_andolan mpscsamnvaysamiti@gmail.com
कधी कुठे महाआक्रोश मोर्चा?
सोमवार २० जून, २०२२
मंगळवार, २१ जून २०२२
गुरुवार, २३ जून २०२२