मुक्तपीठ टीम
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग तीन दिवस चौकशी करण्यात आली आहे. आतापर्यंत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राहुल गांधी यांची ३० तास चौकशी केली आहे. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीवरून काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी राहुल गांधींना ईडीकडून अमानुष वागणूक दिली जात असल्याचा आणि त्यांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.
सूडबुद्धीने केली जातेय चौकशी!
- संसद सदस्याशी केलेल्या अमानुष वर्तणुकीमुळे राजकीय सूडबुद्धीचा कट असल्याचा संशय येतो.
- काँग्रेस नेते चौधरी यांनी लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांना विनंती केली की, तुम्ही आमचे आश्रयदाते आहात आणि अशा परिस्थितीत राहुल गांधी यांच्याशी होत असलेल्या अपमानास्पद वागणुकीबाबत तुम्ही हस्तक्षेप करावा.
ईडीने तिसऱ्या दिवशीही राहुलची चौकशी केली…
- नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी ईडीने चौकशी केली.
- ईडीने त्यांना असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड आणि यंग इंडियन कंपनीशी संबंधित निर्णयांमध्ये त्यांच्या वैयक्तिक भूमिकेबद्दल चौकशी केली.
- ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, एजेएलच्या मालकीच्या सुमारे ८०० कोटी रुपयांच्या मालमत्तेबद्दल राहुल गांधींना प्रश्न विचारले जात आहेत.
- तसेच यंग इंडियन ही ना-नफा कंपनी आपल्या जमिनी आणि इमारती भाड्याने देण्याचे व्यावसायिक उपक्रम कसे राबवत होती हे सुद्धा विचारण्यात आले.
- याच प्रकरणी ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना २३ जूनला हजर राहण्यास सांगितले आहे.
- कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सोनिया गांधी यांची तब्येत बिघडली असून त्यांना सध्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- आई आजारी असताना राहुल गांधींना सतत चौकशीला सामोरे जाण्यास भाग पाडणे अमानूष असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.
- तसेच सोनिया गांधी अद्याप रुग्णालयात असतानाही त्यांना २३ जून रोजी ईडीसमोर येण्यास सांगणेही तसंच राजकीय सूडबुद्धीचे मानले जाते.