तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
शिवसेनेचे युवा नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा अयोध्येचा दौरा हा राजकीय नाही, असे सांगितलं जातं. पण तरीही त्याची चर्चा खूप जोरात सुरु आहे. राजकीय नाही, असं सांगितलं जात असलेला हा अयोध्या दौरा का महत्वाचा ठरतो आहे, ते समजून घेणं आवश्यक आहे. त्यासाठीच महत्वाच्या ५ मुद्द्यांमधून ते मांडलं आहे.
आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौरा आणि ५ महत्वाचे मुद्दे
- शिवसेना हिंदुत्ववादीच हे ठसवणं!
- खूप असतील भगवाधारी, आम्हीच हिंदुत्ववादी!
- राज्याच्या बाहेरही सक्रिय!
- आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाला राष्ट्रीय वलय प्राप्तीचा प्रयत्न
- शिवसैनिकांमध्ये चैतन्य!
मुद्दा -१
शिवसेना हिंदुत्ववादीच हे ठसवणं!
शिवसेना म्हटलं की कडवट हिंदुत्व हे एक ठरलेलं समीकरण. शिवसेना भाजपा युती असताना भाजपालाही झेपणार नाही, अशी आक्रमक भूमिका शिवसेना घेत असे. पुढे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेचे निर्णय घेऊ लागले, आदित्य ठाकरेंचं एक वेगळं युवा नेतृत्व पुढे आलं तरीही शिवसेनेची हिंदुत्वाच्या भूमिकेतून ढळली, असं झालं नाही. व्हँलेटाइन डे वगैरे टोकाच्या विरोधाचे टीव्ही कॅमेऱ्यांसाठीची आंदोलनं थांबलीत पण हिंदुत्वाची भूमिका कायमच राहिली. काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी करत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी शिवसेनेने खेळली. आणि भाजपाने शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेलाच संशयाच्या भोवऱ्यात ओढण्यास सुरुवात केली. त्यामुळेच स्वत: उद्धव ठाकरे सातत्यानं हिंदुत्वाची शिवसेना संस्कृतीतील भूमिका ठासून मांडत असतात. त्यातच मधल्या काळात मनसे भगवाधारी झाली. शिवसेनेला मराठीत्वाच्या मुद्द्यावर राजकीय नुकसान पोहचवणारा हा पक्ष गेले काही वर्षे तसा थंडावला होता. पण नव्या आक्रमकपेक्षाही आक्रस्ताळे म्हणाव्या अशा हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे पुन्हा सक्रिय झाला. भोंग्यावरील अजानमुळे राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनला. त्यात पुन्हा नवनीत राणा, रवी राणा यांना पुढे करुन हनुमान चालिसा प्रकरण गाजवण्यात आले. त्यामुळे शिवसेनेला राष्ट्रीय पातळीवर आजही शिवसेना हिंदुत्ववादीच असल्याचं ठसवणं आवश्यक होतं. तसंच मतदारांच्या मनातही ते बिंबवणं गरजेच होतं. त्यादृष्टीने आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा महत्वाचा आहे.
मुद्दा -२
खूप असतील भगवाधारी, आम्हीच हिंदुत्ववादी!
शिवसेना आपल्या मतदारांना आणि राष्ट्रीय पातळीवर आपल्या हिंदुत्ववादी धोरणाचा संदेश देण्यात यशस्वी झाली. शिवसैनिक मोठ्या प्रमाणात अयोध्येत गेले. तेथे जाताना त्यांनी केलेली शिवसेनेची वातावरण निर्मिती इतर कुणीही कितीही आव आणला तरी आम्हीच हिंदुत्ववादी असल्याचा थेट संदेश देणारी होती. त्यात पुन्हा उत्तरप्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्या इशाऱ्यानंतर मनसेनं राज ठाकरेंचा दौरा गुंडाळल्यानंतर आदित्य ठाकरेंचा दौरा अधिकच उठून दिसणारा आहे.
मुद्दा -३
राज्याच्या बाहेरही सक्रिय!
शिवसेना ही शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हयात होते तेव्हापासून सतत राष्ट्रीय पातळीवर सक्रिय राहिली आहे. पण शिवसेनेला म्हणावं तसं त्यात यश मिळालं नाही. शिवसेनाप्रमुखांच्या जहाल मतांमुळे शिवसेना कायम चर्चेत मात्र राहिली. आताही कधी मोदीविरोधी तर कधी आणखी काही अशा आक्रमक भूमिकांमुळेच शिवसेना चर्चेत राहते. त्यात पुन्हा उद्धव ठाकरेंचा राष्ट्रीय पातळीवरही पक्षाला महत्व मिळवून देण्याचा प्रयत्नही लपून राहिलेला नाही. दादर नगर हवेलीच्या खासदारांच्या मुंबईतील आत्महत्येनंतर त्यांच्या पत्नीने शिवसेनेची साथ घेतली. शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेर प्रथमच खासदार निवडून आला. यापूर्वी पवन पांडे नावाचे आमदार उत्तरप्रदेशातून १९९०मध्ये निवडून आले होते. त्यानंतर प्रथमच महाराष्ट्राबाहेर एवढ्या मोठ्या पदावरील लोकप्रतिनिधी निवडून आला.
आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामुळे शिवसेना इतर राज्यातही सक्रिय असल्याचा संदेश आपोआपच गेला.
मुद्दा -४
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाला राष्ट्रीय वलय प्राप्तीचा प्रयत्न
अयोध्या दौऱ्याचं एक महत्व म्हणजे हा दौरा हा आदित्य उद्धव ठाकरेंचा दौरा होता. एकट्याचा. मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोबत असताना ते दोन वेळा अयोध्येला गेले होते. पण हा पहिला आदित्य ठाकरेंचा असा दौरा होता. त्यामुळे स्वाभाविकच आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाला एक प्रकारे राष्ट्रीय वलय प्राप्त करून देण्याचा प्रयत्नही दिसून आला.
मुद्दा -५
शिवसैनिकांमध्ये चैतन्य!
आदित्य ठाकरे अयोध्येत जाण्यापूर्वीच शिवसैनिक महाराष्ट्रातून निघाले. रेल्वेमार्गे जाणाऱ्या या शिवसैनिकांची नेहमीचे जयघोष, घोषणाबाजी, हातीतल भगवे झेंडे यांच्यामुळे शिवसेनेची एक वातावरण निर्मिती होत राहिली. आदित्य ठाकरेंनीही विमानाने लखनौला गेले. तेथे त्यांचे स्वागत झाले. ते पुढे रस्त्याने अयोध्येला गेले. या सर्व प्रवासातील त्यांचं स्वागत, घोषणाबाजी शिवसैनिकांमध्ये चैतन्य सळसळत असल्याचं दिसून आलं. कार्यकर्त्यांना असे कार्यक्रम लागतात. ती गरज या दौऱ्यामुळे भागल्याचं दिसलं.
एकूणच आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा थेट राजकीय नसला तरी शिवसेनेला, आदित्य ठाकरेंना आणि स्वाभाविकच उद्धव ठाकरेंसाठी महत्वाचा ठरला. तो त्यातून साधल्या गेलेल्या राजकीय हेतूसिद्धीमुळेच!
दौरा महत्वाचा, पण शिवसेनेचं राष्ट्रीय पातळीवरील सक्रियतेत सातत्य आवश्यक!
शिवसेनेला राष्ट्रीय पातळीवर सक्रिय झाले पाहिजे. किमान प्रादेशिक हिंदुत्वाची भूमिका घेऊन चालताना राष्ट्रीय पातळीवर इतर प्रादेशिक पक्ष महत्वाच्या भूमिकेत वावरतात, तसे वावरलेच पाहिजे. भाजपासोबतच्या युतीत तेवढी महत्वाची भूमिका शिवसेनेच्या वाट्याला आली नव्हती. अनेकदा तर रामविलास पासवानांसारख्या हिंदुत्ववाद न मानणाऱ्यांना बळ नसतानाही चांगली खाती आणि शिवसेनेची कायम अवजड उद्योगासारख्या खात्यावरच बोळवण झाली. आता मात्र शिवसेनेनं आपलं राजकीय महत्व वाढवलं पाहिजे.
महाराष्ट्रातील राजकारणाबरोबरच बाहेरही राजकारण करायचं असेल तर तशी सातत्यपूर्ण सक्रियता वाढवावी लागेल. तेथेही. महाराष्ट्राबाहेर खासदार निवडून आल्या. पण त्यांचं आणि शिवसेनेचं सध्याही सक्रिय नातं आहे, हे दिसलंही पाहिजे. फक्त नाममात्र नातं नसावं. तसंच गोवा, कर्नाटक, उत्तरप्रदेशात किंवा अन्य कुठेही फक्त निवडणूक आली की निवडणूक पर्यटकांसारखं शिवसेनेच्या नेत्यांनी जाऊ नये. त्यांनी त्या राज्यांना गंभीरतेने घेतलं पाहिजे. तेथे संपर्कात सातत्य राखलंच पाहिजे. शिवसेनेत या सातत्याचा अभाव दिसतो.
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)
संपर्क ट्विटर @TulsidasBhoite मोबाइल 9833794961