मुक्तपीठ ठीम
मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदिप संगवे यांची चौकशी करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाचे नितीन दळवी यांनी शिक्षण मंत्री व शालेय शिक्षण विभाग यांच्या कडे दाखल केल्या आहेत. परंतु आजवर त्या तक्रारींवर कारवाई झालेली नाही. आता मात्र माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार संगवे यांच्या चौकशीचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत.
महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनिमय) अधिनियम २०११ मधील नियमांचे व इतर प्रचलित कायद्यांचे भंग करणाऱ्या शैक्षणिक संस्थेवर कारवाई करण्याचे अधिकार विभागीय शिक्षण उपसंचालक यांना असतात. मात्र पुरावे सादर करुन देखील मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदिप संगवे बडया शाळा प्रशासनावर ठोस कारवाई करत नाहीत. शाळा प्रशासनाला पाठीशी घालणे, तसेच अशा प्रकरणांमध्ये जाणिवपूर्वक दिरंगाई करण्यासाठी प्रकरणे अधिकार नसलेल्या शुल्क नियामक समिती व तक्रार निवारण समिती कडे वर्ग करून शाळा प्रशासनास पाठीशी घालणे असे प्रकार करतात, असे गंभीर आक्षेप पालक संघटनांनी घेतलेले आहेत. या बाबत बऱ्याच तक्रारी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाचे नितीन दळवी यांनी शिक्षण मंत्री व शालेय शिक्षण विभाग यांच्या कडे दाखल केल्या आहेत. परंतु आजवर त्या तक्रारींवर कारवाई झालेली नाही.
त्याचबरोबर इतरही काही गंभीर आक्षेप आहेत. शिक्षण निरीक्षक देविदास महाजन यांच्या सर्व तक्रारी चौकशी न करता दप्तर दाखल करायचे कामही संगवे यांनी केले. तसेच नोव्हेंबर २०२१ मध्ये शासनाने देविदास महाजन यांच्या तक्रारींवर ८ दिवसात अहवाल सादर करण्याच्या शासन आदेशाचे उपसंचालक संगवे यांनी आजतागायत पालन न केल्याबद्दलही शिक्षण मंत्री व शालेय शिक्षण विभागाकडे पालक महासंघाचे नितीन दळवी यांनी तक्रार केली आहे.
वरील सर्व तक्रारींच्या अनुशंगाने शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांच्या चौकशीचे आदेश शिक्षण सहसंचालक नितीन उपासनी यांना दिले आहेत.
वरील सर्व प्रकरणाची रीतसर चौकशी होऊन शासन स्तरावर नियमानुसार कारवाई न झाल्यास सर्व प्रकरणाची दाद उच्च न्यायालयात मागायचे महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघातर्फे नितीन दळवी यांनी ठरवले आहे.