तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
शिवसेनेचा एक सामान्य शिवसैनिक…संजय पवार मावळा आम्ही राज्यसभेच्या निवडणुकीत उतरवला आहे, असं अभिमानाने सांगणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत आता तो मावळा का पडला त्यासाठी व्यथित होऊन आरोप करत आहे. त्यांचं दु:ख स्वाभाविक आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ म्हणतात तसा मुळात संजय राऊतांचाच विजय धोक्यात आला होता. त्यामुळे घोडे दौडले आणि मावळा पराभूत झाला, हे खरं आहे. पण त्यासाठी केवळ भाजपाकडे, अपक्षांकडे बोट दाखवण्याबरोबरच आत्मपरीक्षणही करणे आवश्यक आहे. कारण यापुढे खरे आव्हान असणार आहे, ते विधान परिषद निवडणुकीत. दहा जागांसाठी होणाऱ्या त्या निवडणुकीत गुप्त मतदान असतं. खुल्या मतदानात असं घडलं, तर तिथं गुप्त मतदानात किती बिघडेल, त्याचा विचार करणं आवश्यक आहे.
आघाडीतील पक्ष, त्यातही शिवसेना किती आत्मपरीक्षण करेल ते ठाऊक नाही, पण किमान नेमकं काय चुकलं त्याचा सरळस्पष्ट वेध घेणं आवश्यक आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची दोन मते वाया गेली
माजी मंत्री अनिल देशमुख, विद्यमान मंत्री नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार सध्या तुरुंगात आहेत. त्यांना न्यायालयाने परवानगी न दिल्याने मतदान करता आले नाही. आजवरचा अनुभव पाहता त्यांना सहजरीत्या मतदानाची परवानगी मिळणार नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळे त्यांच्या मताधिकारासाठी जामीन मिळवण्यासाठी खरंतर आधीपासून प्रयत्न झाले पाहिजे होते. उशिरा प्रयत्न सुरु करण्यात आले. सत्र न्यायालयाने नाकारल्यानंतर नवाब मलिकांनी उच्च न्यायालयात प्रयत्न केले. अनिल देशमुखांनी तेही केले नाही. त्यांनी वेळेत परवानगी मागितली असती, तर कदाचित सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रयत्न करणे शक्य होते. किमान ऐनवेळी धक्का बसला नसता.
शिवसेनेचे एक मत वाया गेले
शिवसेनेचे नाशिकमधील आमदार सुहास कांदे यांचे मत वाया गेले. त्यांनी ते इतर पक्षांच्या निवडणूक प्रतिनिधींनाही दाखवले. मुळात अनेक दिवस पंचतारांकित हॉटेलमध्ये जे प्रशिक्षण देण्यात आले, त्यात काय करायचं आणि काय नाही करायचं, त्यात मत कुणाला दाखवायचं आणि कुणाला नाही दाखवायचं, कसं दाखवायचं, कसं नाही दाखवायचं, याचा समावेश नव्हता का? अशीही चर्चा सुरु झाली आहे. कारण काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांविरोधातही तशा तक्रारी झाल्या.
कोटा वाटप
महाविकास आघाडीकडे १६६ मते होती. जर प्रत्येक उमेदवारासाठी ४१ +१ असा ४२चा कोटा ठरवत १६८ ची भक्कम खात्रीलायक जमवाजमव करण्यात आली असती तर भीती नव्हती. याशिवाय इतर काही मतांसाठी गंभीरतेने प्रयत्न झाले असते तर आकडा आणखी वाढू शकला असता.
महाविकास आघाडीच्या चारही उमेदवारांमध्ये उपलब्ध मतांचे वाटप हे समप्रमाणात कोटा होईल असे करून चारही उमेदवारांना पहिल्या फेरीतच निवडून आणता आले असते. पण महाविकास आघाडी ही पहिल्या फेरीसाठी आघाडी म्हणून विचार करण्याऐवजी पक्षीय भूमिकेला प्राधान्य देत लढली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांना ५ जास्तीची मते मिळाली. ती जर सहाव्या उमेदवाराकडे वळली असती तर त्यांचा मार्ग सुकर झाला असता. पहिल्या फेरीचं बळ दिसलं असतं तर चलबिचल असणारे आणखीही काही आमदार आघाडीकडे वळलेही असते. पण तसे झाले नाही.
दुसरी फेरी रणनीती
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी समर्थकांना आपल्याकडे वळवण्याबरोबरच दुसऱ्या पसंतीच्या मतांचा फायदा उचलण्यासाठी पहिल्या दोन उमेदवारांना गरजेपेक्षा खूप जास्त म्हणजे प्रत्येकी ४८ मतांचे नियोजन केले. त्यामुळे पहिल्या फेरीनंतर त्यांची मते ही सर्वाधिक मतांच्या निकषावर भाजपाचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या पारड्यात पडली. फडणवीसांच्या या रणनीतीचा भाजपाला फायदा झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ यांनीही म्हटले आहे. पहिल्या पसंतीच्या जास्त मतांची अशी रणनीती स्वीकारणे आघाडीला शक्य नव्हते. पण किमान त्यांना पहिल्या फेरीसाठी योग्य नियोजन करणे अशक्य नव्हते.
एकनाथ शिंदे बाजूला, राऊतांसोबत अयोध्येला!
मुळात आता आरोप करण्यापेक्षा निवडणुकीसाठी मतांची समीकरणे जुळवली जात असताना शिवसेनेचे नेते संजय राऊत, एकनाथ शिंदे यांनी अयोध्येला जाणं खरचं गरजेचं होतं का? राज्यसभा निवडणुकीच्या रणनीतीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कुठेच दिसले नाहीत. त्यांना कुठेही महत्व दिले असावे असे वाटले नाही. सध्या हा एकमेव नेता असा आहे, जो शिवसेनेसाठी खर्च करताना दिसतो. शिवसेनेसाठी वैद्यकीय सेवा, आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सक्रिय दिसतो. त्यांच्या प्रभावक्षेत्रातील ठाणे, पालघर या दोन जिल्ह्यात शिवसेना निवडणुकीच्या राजकारणातही पुढे दिसते. मात्र का कोणास ठाऊक ते या राज्यसभा निवडणुकीच्या रणनीतीत कुठेच नव्हते. पालघर जिल्ह्यातील बविआच्या ३ आमदारांची व्यवस्था करण्याची जबाबदारी संजय राऊतांवर सोपवणे अशक्य नव्हते. पण तसे झाले नाही.
आज अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले.अत्यंत सकारात्मक ऊर्जा असलेले हे तीर्थस्थान आहे.माझ्यासोबत श्री. एकनाथ शिंदे, वरुण सरदेसाई,सूरज चव्हाण,अनिल तिवारी,जीवन कामत होते.15 तारखेस अयोध्येत अदित्य ठाकरे यांचे आगमन होत.त्या सोहोळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.
जय श्रीराम! pic.twitter.com/AWL72FqBH3— Sanjay Raut (@rautsanjay61) June 6, 2022
राष्ट्रवादी काँग्रेसवर जास्तच विसंबून राहण्यापेक्षा शिवसेनेनं आपलीही रणनीती अधिक चांगली ठरवणं आवश्यक होते. राजकारणात दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कारभार अधिक लवकर थांबला हे शाश्वत सत्य आहे. तसं नाही केलं तर मग शरद पवारांनी मांडलं ते मत ऐकावं लागतं. ते म्हणाले संख्याबळ नसतानाही शिवसेनेने रिस्क घेतली. ३३ पर्यंत मजल मारली.
माणसांची किंमत ठेवा, मान राखा!
संजय पवारांच्या पराभवानंतर इतर कुणाच्या काही प्रतिक्रिया तसा खुपणाऱ्या दिसल्या नाहीत. मात्र, संजय राऊतांनी थेट नाव घेऊन अपक्ष आमदारांना लक्ष्य केलं आहे. नावं घेण्यालाही हरकत नाही. पण ती करताना आपल्या भविष्यातील गरजेचाही विचार केला जाणे ही खरी चाणक्यनीती ठरली असती.
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)
संपर्क ट्विटर @TulsidasBhoite मोबाइल 9833794961