मुक्तपीठ टीम
राज्यातील राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार यांना भाजपाच्या धनंजय महाडिक यांनी पराभूत केलं. शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट महाआघाडीच्या चौथ्या विजयात बाधक ठरलेल्या सहा आमदारांची नावे सांगितली. त्यातील तीन आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानणारे असल्याचं मानलं जातं. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या राऊतांनी दादांनाच लक्ष्य केलं की काय, अशी चर्चा आहे. पण त्याचवेळी पालघर जिल्ह्यातील बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याशी राऊतांचेही जवळचे संबंध असल्याचे मानले जाते. त्यामुळे मग त्यांच्या शिवसेनाविरोधी मतदानाचे काय असा प्रश्न पुढे आला आहे.
संजय राऊतांनी उघड केली आमदारांची नावे!
- राज्यसभा निवडणुकीत आम्ही निसरड्या वाटेवर होतो.
- ज्या लोकांनी आम्हाला शब्द दिला होता तो पाळला गेला असता तर शिवसेनेच्या उमदेवाराचा पराभव झाला नसता.
- विशेषत: वसई-विरारच्या हितेंद्र ठाकूर यांच्या बविआची तीन मते आम्हाला मिळाली नाहीत.
- त्यानंतर करमाळ्याचे संजयमामा शिंदे, नांदेडचे श्यामसुंदर शिंदे आणि अमरावतीचे देवेंद्र भुयार या आमदारांची मते आम्हाला मिळाली नाहीत.
- महाविकास आघाडीची सगळी मतं जशीच्या तशी आम्हाला मिळाली आहेत.
- फक्त घोडेबाजारातील सहा-सात मतं न मिळाल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला.
- काही घोड्यांवर जास्त बोली लागली.
- त्यामुळे बाजारात असलेले हे घोडे विकले गेले.
- घोड्यांना हरभरे टाकले की ते कुठेही जातात.
- पण विकले जाणारे लोकं कुणाचेच नसतात.
- साधारण ६ आमदारांनी आम्हाला धोका दिला, त्यांनी शब्द देऊनही मत दिलं नाही.
संजय राऊत यांनी नाव घेतलेले आमदार कुणाचे?
आमदार संजयमामा शिंदे – सोलापूर – करमाळा मतदारसंघ- अजित पवार यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. पण त्याचवेळी ते भाजपाशीही चांगले संबंध राखून आहेत.
आमदार श्यामसुंदर शिंदे – नांदेड – लोहा मतदारसंघ – मुळात प्रशासनात असणारे शिंदे हे रायगड परिसरातील नियुक्तीदरम्यान शेकापच्या जयंत पाटलांशी सुत जमवलं. त्यानंतर ते नांदेडच्या लोहातून शेकापची उमेदवारी मिळवत आमदार झाले. फडणवीसांनी अजितदादांसोबत ७२ तासांचे सरकार स्थापन केले तेव्हा ते त्यांच्याशी जवळीक दाखवत असत. नंतर लगेच ते फक्त आणि फक्त अजितदादांचे गुणगाण करु लागले. २७ जून २०२१ रोजी तर त्यांनी दादांच्या कामांमुळे प्रभावित होऊन आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचेही जाहीर केले होते.
आमदार देवेंद्र भुयार – अमरावती – एकच वादा, अजितदादा! असं म्हणणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारण्यांपैकी एक म्हणजे आमदार देवेंद्र भुयार. शिवसेनेच्या कुणीही सांगितलेलं नसूनही मी अजितदादांनी सांगितल्यामुळे महाविकास आघाडीलाच मतदान करणार असे त्यांनी जाहीर केले होते.
संजय राऊत बेछूट बोलतायत, देवेंद्र भुयारांचा आरोप!
- मी कुठलाही दगाफटका केलेला नाही.
- माझी मुख्यमंत्र्यांवर नाराजी आहे पण माझी वैयक्तिक नाराजी नाही.
- माझ्या मतदारसंघातील काही प्रश्न आहेत.
- आमच्या प्रश्नांसाठी वेळ दिला नाही, त्यावरुन माझी नाराजी नाही.
- माझी नाराजी मुख्यमंत्र्यांवर होती जी मी उघडपणे व्यक्त केली, नाराजी उद्धव ठाकरेंपुढे नाही तर काय दाऊद समोर मांडायची का?
- यांच्याकडे पहिल्या पसंतीची मते नव्हती, जी ३३ मतं मिळाली ती आमची अपक्षांची होती, ती मतं काही अमेरिकेतून आली नव्हती.
- त्यांनी सांगितलेल्या सिक्वेंन्सनुसार मी मतदान केलं.
- मी भाजपाकडे कसा जाईन?
- माझ्या विरोधात उभे असलेले बोंडे तिकडं उभा होते.
- मी त्यांच्याकडे कसा जाईल.
- संजय राऊत बेछूट बोलत आहेत जे योग्य नाही, याबद्दल मुख्यमंत्री आणि शरद पवारांशी बोलणार आहे.
आधी उद्धव ठाकरेंना विचारा मग आरोप करा! – संजय शिंदे
- माझ्यावर संजय राऊत यांनी केलेले आरोप धादांत चुकीचे आहेत.
- मी घोडेबाजारातील आहे का नाही हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहित आहे.
- सत्ता स्थापनेच्या वेळी मला उद्धव साहेबांनी घरी बोलून काय काय ऑफर दिल्या होत्या, मी काय काय स्वीकारल्या हे विचारुन घ्या आणि मग आरोप करा.
- “शिवसेनेचे नेते अनिल देसाई आणि अरविंद सावंत या दोघांबरोबर जाऊन मी मतदान केलं.
- त्यांनी जो कागद दिला त्यापद्धतीने मतदान केलं.
- जर घोडेबाजार झाला असेल तर त्यांनी कालच सांगितलं असतं.
- महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे मतदान केलं.
- आघाडी सरकार स्थापन होता मला विमानाने नेलं, मंत्रिपदाची ऑफर दिली ते मी अजून कुठे एक्सपोज केलं नाही.
अपक्षांना बदनाम करून नाही चालणार- बच्चू कडू
- रिस्क न घेता आपापल्या उमेदवाराला जास्त मतं टाकण्याच्या नादात महाविकास आघाडीचा गेम बिघडला.
- सोबतच पूर्णतः अपक्षांना बदनाम करून नाही चालणार, काही अपक्ष सोबतही होते.
- अमरावती जिल्ह्यातील एक अपक्ष आमदार जो आघाडीसोबत आहे तो देखील या घोडेबाजारात सहभागी आहे.