मुक्तपीठ टीम
“कार्य ही पूजा आहे आणि कर्तव्य बजावणे म्हणजे परमेश्वर आहे. ग्राहकांना वेळेत आणि खात्रीशीर डबा पोहचवणे हे परमेश्वरी कर्तव्य आम्ही चोख पार पाडतो,” असे मुंबई डबेवाला संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ मेदगे यांनी पुण्यातील व्वस्थापन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. डबेवाल्यांच्या कामाचे स्वरूप, काम करणारे डबेवाले, कोडिंग सिस्टीम, अर्थरचना, त्यांची कौटुंबिक स्थिती, कामाची घेतली गेलेली दखल, विविध सन्मान अशा विविध पैलूतून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यांच्याकरीता ‘सप्लाय चैन मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन केले होते. यानिमित्ताने रघुनाथ मेदगे यांनी सूर्यदत्त शिक्षण संकुलास भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मेदगे यांना ‘सूर्यगौरव राष्ट्रीय सन्मान’ प्रदान करण्यात आला.
प्रसंगी सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, संचालक प्रशांत पितालिया, सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सच्या प्राचार्य डॉ. सिमी रेठरेकर, प्रा. अवसरकीर, प्रा. गायकवाड, अमोल गुप्ते यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. डॉ. संजय चोरडिया, रघुनाथ मेदगे यांच्या हस्ते डब्याची पूजा करण्यात आली.
रघुनाथ मेदगे म्हणाले, “मुंबई डबा पुरवठा संघ संस्थेला सिक्स सिग्मा, आयएसओ अशी प्रमाणपत्रे मिळाली आहेत. परंतु ग्राहकांना वाटणारा विश्वास या एका मुद्द्याच्या आधारे आजवर अगदी नगण्य चुका करीत कामकाज सांभाळले आहे. साधारणतः ६० ते ७० किलोमीटरमध्ये सुमारे चार लाख डब्यांची व्यवस्था पाहिली जाते. डबेवाल्यांचे शिक्षण साधारण आठवी पास असते. ऊन, वारा, पावसात डबेवाला डबे पोहचविण्याचे काम करत असतो. परंतु कोरोना काळात मात्र डबेवाल्यांना पहिल्यांदाच आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले.”
‘जो करे पति से प्यार, वो कैसे करे डबेवाले से इन्कार’ अशी शायरी आणि जिंगल्सची पेरणी करत अत्यंत खुमासदारपणे विषयाची मांडणी केली. डबेवाल्यांच्या प्रवास उलगडला. प्रिन्स चार्ल्स यांनी चर्चगेट स्टेशन येथे २००३ मध्ये भेट देऊन डबेवाल्यांच्या कामाची पाहणी करत कौतूक केल्याचे त्यांनी सांगितले. व्हर्जिन अटलांटिक एअरवेजचे अध्यक्ष रिचर्ड ब्रॅन्सन यांनीही प्रत्यक्ष रेल्वे डब्यातून डबेवाल्यांसोबत प्रवास केल्याचे सांगितले. ‘सूर्यदत्त’ने आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात माझ्या संवादातील ७५ मुद्दे समोर ठेवत ७५ वेळा डब्यांचा गजर करत दिलेली मानवंदना अनोखी व वैशिष्ट्यपूर्ण होती. आजवर अनेक मानसन्मान मिळाले; परंतु अशी मानवंदना मिळाली नव्हती, असे मेदगे यांनी नमूद केले.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांकरिता डबेवाल्यांच्या संदर्भात विशेषतः सप्लाय चैन मॅनेजमेंटविषयी रघुनाथ मेदगे यांनी मांडलेले विचार प्रेरणादायी आहेत. वेळेचे व्यवस्थापन, संघ भावना, शिस्त, कामाप्रती आदर, साधेपणा, ध्येयनिष्ठा या गोष्टी ठळकपणे त्यांच्या सादरीकरणातून समोर आल्या. चार भिंतीपलीकडचे शिक्षण किती प्रभावी असते, याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला असेल. मुंबई डबेवाल्यांच्या सादरीकरणाने ज्ञानाच्या देवाणघेवाणीचा हा उपक्रम सुरु झाला आहे.” सूत्रसंचालन प्रा. अपर्णा देशमुख यांनी केले. प्रा. प्रशांत पितालिया यांनी आभार मानले.