मुक्तपीठ टीम
गेली अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना पक्षाच्यावतीने केलेले काम, कार्यकर्त्यांनी केलेली कामगिरी याचा उल्लेख करणारी ‘कटिबद्धता राष्ट्रवादीची, अडीच वर्ष जनसेवेची’ या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते आज पत्रकार परिषदेत करण्यात आले.
यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे, ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आदी उपस्थित होते.
आमचं महाविकास आघाडीचे सरकार आदरणीय पवारसाहेबांच्या पुढाकाराने स्थापन झाले. अडीच वर्षांमध्ये सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली कामगिरी आणि वेगवेगळे निर्णय, त्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी घेतलेले निर्णय, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात विशेषतः कोरोना काळात जे संकट आले त्या काळात पक्षाच्यावतीने केलेली कामे त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रत्येक खेडेगावात पोचून केलेलं काम व नागरी वस्ती, नगरपालिका महानगरपालिकेत केलेले काम एकत्रित संकलित करून या पुस्तकाच्या माध्यमातून समोर आणले आहे.
वित्त विभागापासून ते राष्ट्रवादीचे जे मंत्री आहेत त्यांनी घेतलेले वेगवेगळे महत्त्वाचे निर्णय विशेषतः शिवभोजन थाळी, गृहनिर्माण विभागाने मुंबई, ब्रृहन्मुंबई मधील सामान्य माणसाला घर कसे मिळेल यासाठी घेतलेला क्रांतिकारक निर्णय असेल याशिवाय गृहविभाग, आरोग्य विभागाचे निर्णय यासर्वांची मांडणी या पुस्तकात करण्यात आलेली आहे.
ग्रामविकास मंत्र्यांनी स्मार्ट ग्राम योजनेचा आबांच्या नावाने सुंदर गाव पुरस्कार देण्याचे काम असेल, मुख्यमंत्री सडक योजनेची कामे असतील, कामगार विभागात केलेले काम असेल अशा वेगवेगळ्या कामांचा आढावा उद्या पक्षाच्या वर्धापन दिनी जनतेसमोर मांडण्यासाठी हे पुस्तक प्रकाशित केले आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
उद्या राज्यसभेचे मतदान असल्यामुळे २० तारखेला सभा घ्यायचे ठरवले होते मात्र त्यावेळी विधानपरिषदेसाठी निवडणूक असल्यामुळे आता ती पुढच्या महिन्यात दिल्लीमध्ये देशातील विद्यार्थी व राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवक कॉंग्रेस यांच्यावतीने हा कार्यक्रम होणार आहे. त्याची नवीन वेळ व तारीख सांगण्यात येईल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या ताकदीप्रमाणे त्यांचे जेवढे निवडून येत आहेत. तेवढीच संख्या राहील अशी अपेक्षा आहे. आणि मतांचा घोडेबाजार होणार नाही यासाठी घोडेबाजार न होण्यासाठी भाजप साधनसूचिता सांभाळणारा पक्ष असल्यामुळे तो त्या मर्यादेत त्यांचे उमेदवार उभे करेल असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
इम्तियाज जलील यांच्याशी संपर्क झाला आहे. आज मुंबईत येऊन भेटतो असे ते बोलले आहेत. ते प्रवासात आहेत अशी माहिती दिलेली आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचा २३ वा वर्धापन दिन आहे. २३ वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. हा पक्ष महाराष्ट्रातील सर्व भागात, जिल्हयात अतिशय वेगाने वाढतोय. तरुणांचे समर्थन महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांचे व विविध पक्षातील विशेषतः भाजपमध्ये गेलेल्या लोकांचा आमच्याकडे येण्याचा ओढा वाढला आहे. खात्री आहे की राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने व आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली भविष्यात या पक्षाला अधिक महत्त्व प्राप्त होईल असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.