तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ पहिल्यांदाच त्यांच्या शिवसेनेला मुंबईबाहेर बळ देणाऱ्या संभाजीनगरात धडाडणार आहे. त्यानिमित्तानं आज तेथील काही स्थानिकांशी बोलताना ज्या भावना समोर आल्या त्या मांडण्याचा हा प्रयत्न.
औरंगाबाद नावाचा मोगली कलंक भाळी लागलेल्या या शहरानं शिवसेनेला आपलं म्हटलं ते नव्वदीच्या दशकात. तेव्हापासून आतापर्यंत जायकवाडीतून बरंच पाणी वाहून गेलं असलं तरी शिवसेनेचं प्रभूत्व आणि बऱ्याच इतर गोष्टीही तशाच राहिल्यात. अगदीच भाजपाच्या रावसाहेब दानवेंच्या जावयाच्या बंडामुळे हैदराबादच्या एमआयएमचा खासदार निवडून आला असला तरी संभाजीनगरावरील प्रभूत्व शिवसेनेनं गमावलं असं कुणी मानलं नाही. त्यामुळेच शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून बोलताना त्यांनी दिलासा देणारी शिवगर्जनाच करावी अशी अपेक्षा आहे.
संभाजीनगरच!
ज्या पापी औरंगजेबानं महाराष्ट्रात धुमाकूळ घातला. स्वराज्य संपवण्याचा नीच प्रयत्न केला. ज्यानं स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र संभाजी महाराजांची अमानुष छळ करून हत्या केली. त्या पापी औरंग्याचं नाव महाराष्ट्रातील एका शहराला असणं हे मुळात सहन केलं जावू नये असंच पाप. त्यामुळेच १९८८मध्ये जेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ओरंगाबाद नाही तर संभाजीनगरच असं सांगितलं तेव्हा मराठवाड्यानं त्यांना आणि शिवसेनेलाही आपलं मानलं. मात्र, तो मुद्दा केवळ औरंगाबादच्या नामांतरापुरताच मर्यादित नाही. तर संभाजीनगर आणि मराठवाड्याचं मागसलेपण दूर सारत प्रगतीच्या सुपरफास्ट महामार्गावर पुढे आणण्याचाही आहे.
अर्थात त्यातही भावनिक गरज लक्षात घेऊन मुंबईत बोलले तसे न बोलता अगदी रोखठोक, सरळस्पष्ट शब्दात संभाजीनगर आणि फक्त संभाजीनगरच, असं ठणकावून सांगावं. महाराष्ट्र सरकारने जर केंद्राकडे ठराव पाठवला असेल तर ते जाहीर करावं. नसेव तर धी पाठवणार तेही सांगावं. आता त्यात काहीही वेगळं नकोच नको.
मराठवाड्याची प्रगती घडवाच!
शिवसेना स्थापनेनंतरच्या २०-२२ वर्षांनी मराठवाड्यात पोहचली. तिथं जो पाठिंबा मिळाला त्या बळावरच शिवसेनेचा सत्तेच्या राजकारणातील अनुशेष भरून निघाला. आता तरी शिवसेनेनं मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष भरून काढावाच. त्यासाठी इतर काही प्रस्थापितांनी आपल्या भागांमध्ये वळवलेला निधीचा महापूर आपल्या निर्धाराचा बांध घालून मराठवाड्याकडे वळवावा.
परभणी देते वारंवार संधी, मग तिला घडला जशी जगात जर्मनी!
परभणीतील माझे मित्र नेहमी सांगतात, युरोपात जर्मनी तशी जगात परभणी! शिवसेनेला ही परभणी नेहमी साथ देत आली आहे. परभणी लोकसभेला शिवसेनेचा खासदार निवडून देते. तो खासदार अनेकदा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडे वळतो. त्यानंतर पुढच्या निवडणुकीत शिवसेना ज्याला धनुष्यबाण देते त्याला पुन्हा परभणी आपलं मानत खासदार बनवते. असं वेड प्रेम एखाद्या पक्षावर करणारा क्वचितच एखादा मतदारसंघ देशात असेल. या प्रेमाचं शिवेसेनेनं उतराई झालं पाहिजे. परभणीविषयी लिहिलं असलं तरी हे मराठवाड्यात सर्वत्र आहे.
ज्यांनी मराठवाड्यात साथ दिली, त्यांना विसरु नका!
शिवसेना मराठवाड्यात आली तेव्हा शरद पवारांनी समाजवादी काँग्रेस गुंडाळलेली. काँग्रेसमध्ये गेलेले. भ्रमनिरास झालेला तरुण वर्ग शिवसेनेकडे आलेला. त्यात प्रस्थापित कुणी नव्हतं. गढीवरचे नव्हते तर सामान्य मराठे होते. ओबीसी समाज घटकांपैकी अठरापगड जाती-जमातीचे तरुण होते. त्यांच्याबळावरच शिवसेनेला मराठवाड्यात बळ मिळालं. आज आरक्षणाची सर्वात मोठी गरज ही त्याच सामान्य मराठ्यांना आहे. त्यांच्यातूनच सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. त्यांना शिवसेनापक्षप्रमुख मुख्यमंत्री झाल्यानं दिलासा मिळालाच पाहिजे, अशी अपेक्षा आहे. ती पूर्ण झालीच पाहिजे. ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण गेलं आहे. ते पुन्हा मिळालंच पाहिजे. जर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून हा वर्ग राजकारणात सक्रिय राहिला नाही तर पुढे संसदीय राजकारणात कसा पुढे जाणार? शिवसेना जातीचं राजकारण करत नसली तरी कसल्याही विषारी आणि विखारी अपप्रचाराला बळी न पडता शिवसेनेला साथ देणाऱ्या या दोन समाज घटकांसाठी शिवसेनेनं कर्तव्य पार पाडलंच पाहिजे.
इतरही अनेक मु्द्दे आहेत. पण ते नंतर कधीतरी. आज शिवसेना पक्षप्रमुखांनी मुख्यमंत्री म्हणून भाषण करताना या अपेक्षांची पूर्ती करणारी शिवगर्जना करावी. कदाचित आजच्या भाषणात आरक्षण हा मुद्दा नसेल. पण मराठवाड्याच्या विकासाचे इतर मुद्दे असलेच पाहिजे. तसेच संभाजीनगरातून शिवसेना पक्षप्रमुख म्हणून नाही पण मंत्रालयातून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचं गाडं पुढे नेणारं निर्णायक पाऊल उचललंच पाहिजे.
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)
संपर्क ट्विटर @TulsidasBhoite मोबाइल 9833794961