मुक्तपीठ टीम
“मोदी सरकारने काळे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी लाखो शेतकरी अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहे. परंतु शेतकरी विरोधी मोदी सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही. शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची भाषा मोदी सरकार करत असताना त्याचवेळी शेतकरी दिल्लीत येऊ नये म्हणून रस्त्यावर मोठे खिळे ठोकले जातात. या शेतकऱ्यांसोबत काँग्रेस भक्कमपणे उभा आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून या आंदोलनाला महाराष्ट्रातून मोठे बळ देऊ”, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी भंडारामध्ये काँग्रेसने भव्य बैलगाडी व टॅक्टर रॅली काढली. या रॅलीला नाना पटोले संबोधित करत होते. यावेळी आमदार अभिजित वंजारी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, भंडारा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, प्रदेश सरचिटणीस झिया पटेल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठे संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन मोदी सत्तेत आले आज सहा वर्षे झाली तरी त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्नही दुप्पट केले नाही आणि शेतमालाला दीडपट भावही दिला नाही उलट शेतकऱ्याला मिळणारा हमी भाव या नवीन कायदे आणून काढून घेतला. शेतकऱ्यांना आतंकवादी, नक्षलवादी म्हणून भाजपाने बदनाम केले. २६ जानेवारीला लाल किल्ल्यावर गोंधळ घालणारा व्यक्ती हा भाजपाचाच होता. त्याला भाजपानेच मोकळीक दिली आणि त्याचे खापर शेतकऱ्यांवर फोडले. आतापर्यंत २०० शेतकरी शहीद झाले तरी मोदी सरकारला अजून जाग आली नाही. शेतकऱ्यांचे आणखी किती बळी घेणार असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.