मुक्तपीठ टीम
दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली मंत्रिंडळातील त्यांचे सहकारी मंत्री सत्येंद्र जैन निर्दोष असल्याचं पुन्हा ठासून सांगितलं आहे. सत्येंद्र जैन हे आरोपी नाहीत, असे केंद्र सरकारनेच न्यायालयाला सांगितले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते आरोपीही नसताना मग ते भ्रष्टाचारी कसे झाले, असा प्रश्न मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
दुसरीकडे, आपचे खासदार संजय सिंह यांनी आरोप केला की, अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी अशी संस्था बनत आहे, ज्याद्वारे विरोधी पक्षांच्या नेत्यांना अपमानित केले जात आहे, तुरुंगात टाकले जात आहे.
केंद्र सरकारची ईडी विजय मल्ल्या, ललित मोदी, नितीन संदेसरा, येडियुरप्पा, व्यापमचे घोटाळेबाज, ईश्वरप्पा यांच्यावर कारवाई करत नाही, पण दिल्ली सरकार आणि सत्येंद्र जैन यांच्यासमोर समस्या आहे की ते मोहल्ला क्लिनिक कसे बांधत आहेत. दिल्लीच्या आरोग्य मॉडेलची देशभर चर्चा का होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय सिंह म्हणाले की, अनेक दिवसांपासून भाजपचे लोक, त्यांचे केंद्रीय मंत्री आणि बडे नेते सत्येंद्र जैन भ्रष्टाचारी असल्याचे गाजावाजा करत होते. त्यांना १० दिवसांच्या रिमांडवर घेण्यात आले होते, तर उच्च न्यायालयात ईडीने सांगितले की, त्यांच्याविरुद्ध कोणतीही एफआयआर किंवा तक्रार नाही, परंतु स्मृती इराणी सत्येंद्र जैन यांना देशद्रोही म्हणत आहेत. “ईडी बिग बॉसचे घर आहे का? की एका मंत्र्याला जबरदस्तीने आपल्या कोठडीत ठेवले आहे.” असा प्रश्न संजय सिंह यांनी केला.
संजय सिंह म्हणाले की, “स्मृती इराणी आणि भाजपने माफी मागावी. सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध सेवांशी संबंधित खटला होता. यामध्ये सीबीआयने २०१८ मध्ये एफआयआरही नोंदवला आणि ४ वर्षांनंतर काहीही निष्पन्न झाले नाही असे सांगून क्लीन चिट दिली. ईडीचा दोषसिद्धीचा दर ०.४ टक्के आहे. यामध्ये जो पैसा उधळला जात आहे तो केवळ आप नेत्यांना तुरुंगात टाकण्यासाठीच होत आहे.