मुक्तपीठ टीम
गेली तीन वर्षे पवना धरण हे सातत्याने शंभर टक्के भरत असतानाही पिंपरी-चिंचवड शहरवासियांवर लादलेली कृत्रिम पाणीटंचाई हे भाजपाचे पाप आहे. पाच वर्षांपूर्वी आंद्रा आणि भामा आसखेडचे पाणी मंजूर झाल्यानंतरही संपूर्ण सत्ताकाळात केवळ टक्केवारीच्या भ्रष्ट राजकारणामुळे शहरवासियांचे अत्यंत हाल झाल्याने त्याची परतफेड शहरातील जनता महापालिकेच्या निवडणुकीत नक्कीच करेल आणि भाजपला सत्तेतून बेदखल करेल, अशा शब्दात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
शहरातील नागरिकांवर पाणीटंचाई लादणाऱ्या आणि अडीच वर्षे महापालिकेत पक्षनेते असतानाही आंद्रा आणि भामा आसखेडचे पाणी शहरवासियांना मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या भाजपच्या एकनाथ पवार यांनी शहरातील पाणीटंचाईचे खापर प्रशासनावर फोडले आहे. त्याबाबत पवार यांनी केलेल्या आरोपांना अजित गव्हाणे यांनी उत्तर दिले असून गेल्या अडीच वर्षांत शहरवासियांनावर लादलेल्या कृत्रिम पाणीटंचाईवर भाजपवर हल्लाबोल केला आहे.
याबाबत गव्हाणे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्तीचा नारा देऊन सत्ता पदरात पाडून घेणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी गेल्या पाच वर्षांत शहरात भययुक्त आणि भ्रष्टाचारयुक्त सत्ताकारण केले. शहराचा पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यासाठी पवना बंद पाईपलाईन ही योजना राष्ट्रवादीने राबविण्यास सुरुवात केली होती मात्र त्याला विरोध भाजपच्या नेत्यांनीच केल्याने ही योजना बंद पडली. यानंतर राष्ट्रवादीने आपल्या सत्तकाळात चोवीस तास पाणीपुरवठ्याचा पायलट प्रकल्प हाती घेतला होता. सन २०१७ मध्ये सत्ता गेल्याने हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी भाजपाची असताना गेल्या पाच वर्षांत त्यांना हा प्रकल्प पूर्ण करता येऊ शकला नाही.
सुरुवातीच्या अडीच वर्षांत पक्षनेता असलेल्या एकनाथ पवार यांनी चोवीस तास पाणीपुरवठा योजनेची माहिती तारखेसह जनतेसमोर ठेवावी, असे आव्हानही गव्हाणे यांनी दिले आहे. गेल्या तीन वर्षांपासून शहरवासियांना एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तीनही वर्षे पवना धरण शंभर टक्के भरलेले असतानाही भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी शहरात कृत्रिम पाणीटंचाई करून टॅकरलॉबीच्या माध्यमातून आपली घरे भरण्याचा प्रयत्न केला. स्वत:च्या स्वार्थासाठी शहरवासियांवर पाण्यासाठी भटकंती करायची वेळ आणली. अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी महापालिकेत प्रशासक आलेला असतानाही आपले पाप लपविण्यासाठी प्रशासकावर पाणीटंचाईचे खापर फोडणे हे हास्यास्पद असल्याचेही गव्हाणे यांनी म्हटले आहे.
गेल्या पाच वर्षांत ठेकेदारांना दमदाटी करणे, टक्केवारी लाटणे, खंडणीखोरी करणे, लाचखोरी करणे एवढेच धंदे भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी केल्याचे येथील जनतेने अनुभवले आहे. राष्ट्रवादीने आपल्या काळात केलेल्या विकासकामांचे श्रेय लाटण्याचा प्रकार एकनाथ पवारसारखे भाजपचे नेते करीत आहेत हे शहराचे दुर्देव आहे. गेल्या पाच वर्षांत शहरवासियांना पाण्याचे दुर्भिक्ष लादणाऱ्या व एकही आश्वासन पूर्ण न करणाऱ्या भाजपला येत्या महापालिका निवडणुकीत शहरातील सुजाण मतदार भाजपला धडा शिकवेल व शहराच्या वादळी विकासासाठी राष्ट्रवादीचे शंभरहून अधिक नगरसेवक महापालिका निवडणुकीत विजयी होतील, असा विश्वासही गव्हाणे यांनी व्यक्त केला आहे.