रोहिणी ठोंबरे
आरोग्याच्या दृष्टीकडे चांगली वाटचाल. प्राणायम, योगासने हा आरोग्यासाठी एक चांगला उपाय आहे, पण त्याचबरोबर सायकलिंग करणे हे सुद्धा अतिशय फायदेशीर आहे. आज जगभरात सायकल दिन साजरा केला जातो. लोकांना सायकल वापरण्यास प्रोत्साहित केले जाते. विशेषत: शहरांमध्ये जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी दुचाकी किंवा इतर डिझेल-पेट्रोलवर आधारित वाहनांऐवजी सायकलचा वापर केला, तर दररोज हजारो लिटर पेट्रोलचा वापर कमी होईल आणि प्रदूषणाची पातळीही कमी होईल.
२०१८ पासून जागतिक सायकल दिन साजरा करण्यात येतो
- ३ जून २०१८ रोजी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेद्वारे प्रथमच जागतिक सायकल दिन अधिकृतपणे साजरा करण्यात आला.
- उद्घाटन समारंभाला संयुक्त राष्ट्राचे अधिकारी, राजकारणी, क्रीडापटू, सायकलिंग समुदायाच्या वकिलांसह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
- सायकल चालवणाऱ्या लोकांना सेवा देण्याचे अनेक मार्गही यावेळी सांगण्यात आले.
जागतिक सायकल दिन साजरा करण्यामागील हेतू म्हणजे, सायकलिंगला वाहतुकीचे सोपे, परवडणारे साधन म्हणून प्रोत्साहन देणे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यात मदत करणे हा आहे. त्याच वेळी, आरोग्य तज्ञ सायकलिंग हा एक परिपूर्ण व्यायाम मानतात.
सायकलिंग केल्याने होणारे फायदे कोण-कोणते आहेत?
१. निरोगी हृदय
सायकलिंगला हा एक चांगला व्यायाम आहे. जेव्हा सायकल चालवता तेव्हा हृदयाला खूप फायदा होतो. अशाप्रकारे हृदय अधिक निरोगी होते आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका देखील कमी होतो.
२. सांधेदुखीपासून आराम
सायकल चालवण्याचा एक मोठा फायदा असा आहे की, यामुळे सांधेदुखी कमी होते. सायकल चालवणे हा संपूर्ण पायाचा व्यायाम आहे. सायकलिंगमध्ये पायांच्या स्नायूंचा चांगला व्यायाम होतो आणि त्यामुळे गुडघे आणि पाय दुखण्यापासून आराम मिळतो.
३. रोगप्रतिकार प्रणाली सुरळीत होते
सायकल चालवल्याने रोगप्रतिकारक शक्ती योग्यरित्या कार्य करते. दररोज अर्धा तास सायकल चालवल्याने रोगप्रतिकारक पेशी सक्रिय होतात आणि आजारी पडण्याचा धोका कमी होतो.
४. कॅलरीज बर्न होतात
सायकल चालवल्याने अतिरिक्त कॅलरी बर्न होण्यास मदत होते. सायकल चालवून एक्स्ट्रा कॅलरीज सहज बर्न करता येतात.