मुक्तपीठ टीम
अहमदनगर येथील पुणतांबा गावातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. पुणतांब्यात पाच दिवसांचं धरणे आंदोलन सुरु आहे. दुधाचे भाव, शेतातील शिल्लक ऊस, कांद्याचे भाव आणि पिकांना हमीभाव अशा विविध मागण्या घेऊन शेतकऱ्यांनी पाच वर्षांनी पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी ग्रामसभा आयोजित करून एकूण १६ मागण्यांचे ठराव मंजूर केले होते.
कृषी दिंडी काढून धरणे आंदोलनास सुरूवात!!
- पुणतांबा येथे बळीराज्याच्या पुतळयाला दुग्धाभिषेक घालून आंदोलनास सुरूवात करण्यात आली आहे.
- बळीराजाच्या पुजनानंतर गावातून कृषी दिंडी काढून धरणे आंदोलनास सुरूवात करण्यात आली आहे.
- शेतकऱ्यांचे हे धरणे आंदोलन ५ दिवस सुरू राहणार आहे.
- या आंदोलनात राज्यभरातील शेतकरी सहभागी होणार आहेत.
- ५ जून पर्यंत राज्य सरकारने आपल्या समस्यांची दखल घेतली नाही तर आंदोलन अधीक तीव्र करण्यात येईल अशीही शेतकऱ्यांनी भूमिका घेतली आहे.
या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या…
- ऊसाला एकरी एक हजार रूपये अनुदान द्यावे.
- शिल्लक ऊसाला हेक्टरी दोन लाख रूपये द्यावे.
- कांद्यासह सर्व पिकांना हमीभाव द्यावा.
- कांद्याला प्रती क्विंटल पाचशे रूपये अनुदान द्यावे.
- शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दाबाने वीज मिळावी.
- थकित वीज बिल माफ झाले पाहिजे.
- कांदा आणि गव्हाची निर्यात बंदी उठवावी.
- सर्व पिकांना आधारभूत किंमत दिली जावी, त्यासाठी आयोगाची स्थापना करून निर्णय घ्यावा.
- २०१७ साली केलेल्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी.
- नियमित कर्ज भरणारांचे अनुदान दिले जावे.
- दुधाला ऊसाप्रमाणे एफआरपी लागू केला जावा.
- दुधाला कमीतकमी चाळीस रूपये दर दिला जावा.
- खाजगी दूध संकलन केंद्रात होणारी लूट थांबवावी.
- वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जावी.
- शेतकरी आंदोलनात दाखल गुन्हे मागे घेतले जावे.
- वन हक्क कायद्यानुसार आदिवासींना जमीनी नावावर केल्या जाव्यात.